आ.मेहता यांच्या जनता दरबारात अनधिकृत प्रकल्पाविरोधात तक्रारी

भाईंदर: मीरा-भाईंदर शहरात परिवहनमंत्री सरनाईक यांच्या लोकदरबारानंतर भाजपने आयोजित केलेल्या भाजपा जनता दरबारात खासगी अनधिकृत प्रकल्पांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याबाबत चौकशी करून थेट कारवाई करण्यात येईल, असा दावा आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लागाव्यात, यासाठी भाजपने भाईंदर येथील जिल्हा कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी आमदार नरेंद्र मेहता नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत होते. याच दरम्यान इम्रान शेख या तक्रारदाराने शिंदे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या व्यावसायिक अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रार दिली.

तक्रारीनुसार चेना येथे उभारण्यात आलेल्या प्रकल्पात पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आले आहे. यासाठी सुमारे ३१२ झाडे तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मीरा रोड येथील नव्या प्रकल्पासाठी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून बांधकाम परवानगी घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

याशिवाय, मीरा रोड येथे उभारलेले एन.एच. हॉस्पिटलदेखील अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या तक्रारी ऐकल्यानंतर आमदार मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. तसेच या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असल्याचे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.