सांस्कृतिक ठाण्याची सक्षम ओळख: डॉ. अश्विनी बापट

वैद्यकीय सेवा, सामाजिक बांधिलकी आणि सक्षम नेतृत्व यांचा सुंदर संगम म्हणजे डॉ. अश्विनी बापट. १९९९ साली अलिबागच्या निसर्गरम्य परिसरातून ठाण्याच्या सांस्कृतिक नगरीत आलेल्या डॉ. बापट यांचा प्रवास एका डॉक्टरपासून सुरू होऊन टीजेएस्‌बी बँकेच्या संचालिका या प्रतिष्ठित पदापर्यंत पोहोचला आहे. वैद्यकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी संकटकाळात ‘अर्सेनिक अल्बम’चे मोठ्या प्रमाणावर वितरण करून समाजसेवेचा वसा जपला. गेल्या १५ वर्षांपासून आषाढी वारीत वारकऱ्यांना सातत्याने रुग्णसेवा देत त्या मानवतेच्या मूल्यांशी निष्ठावान राहिल्या आहेत.

ठाणे शहराशी त्यांचे नाते अत्यंत भावनिक आहे. ‘श्रीस्थानक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्याने मेट्रो, उड्डाणपूल, रुंद रस्ते, वाढता व्यापार आणि गगनचुंबी इमारती यांसारख्या आधुनिक क्षमतांनी नवे रूप धारण केले असले, तरी शहराची सांस्कृतिक ओळख अजूनही तितकीच जिवंत आहे. त्या सांगतात की, आजची टेक्नोसॅव्ही तरुण पिढी आधुनिकतेसोबत संस्कृतीलाही जपते; याचे सुंदर प्रतिबिंब दिवाळी पहाट आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रेतील जल्लोषात दिसते. पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईचा उत्साह, एकमेकांच्या भेटीगाठी आणि सण-उत्सवातील आपुलकी ठाण्याच्या सांस्कृतिक वारशाला अधिक दृढ करतात. आधुनिक बदलांच्या प्रवाहातही नाती, प्रेम आणि परंपरेची ओढ टिकून आहे; म्हणूनच “भरोसे का बँक, भविष्य का बँक” हे टीजेएस्‌बी बँकेचे ब्रीदवाक्य तरुणाईच्या डोळ्यांतही प्रतिबिंबित होताना दिसते. बँकिंग क्षेत्रातील या विश्वासाचा पाया शहराच्या समृद्ध सांस्कृतिक मुळांशी जोडलेला आहे, असे त्यांना प्रकर्षाने वाटते.

शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत ऐतिहासिक मंदिरे आणि वास्तूंचा मोठा वाटा असल्याचे डॉ. बापट आवर्जून नमूद करतात. ठाण्याचे ग्रामदैवत श्री कौपीनेश्वर मंदिर, नौपाड्यातील घंटाळी मंदिर आणि श्री. किल्ला मारुती मंदिर यांसारखी प्राचीन मंदिरे, तसेच मराठी ग्रंथसंग्रहालय व नगर वाचन मंदिर या ऐतिहासिक वास्तू ठाण्याच्या अस्मितेची प्रतीके आहेत. त्यांच्या मते, आज मंदिरे केवळ धार्मिक केंद्रे न राहता ती सामाजिक प्रबोधनाचे केंद्रबिंदू होणे ही काळाची गरज आहे आणि ठाण्यातील मंदिरे हे काम समर्थपणे पार पाडत आहेत. विशेष म्हणजे, आजची तरुणाई या वास्तूंकडे आणि त्यावरील कोरीव कामाकडे केवळ श्रद्धा म्हणून न पाहता एका अभ्यासू वृत्तीने पाहू लागली आहे. स्थापत्यशास्त्राचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसताना निर्माण झालेली ही हेमाडपंथी मंदिरे शहराच्या सुसंस्कृत आणि कल्पक वारशाची साक्ष देतात, असे त्या अभिमानाने सांगतात.

केवळ पुस्तकांच्या देवाण-घेवाणीपुरते मर्यादित न राहता, मराठी ग्रंथसंग्रहालयासारख्या वास्तू आज ‘संदर्भ केंद्र’ म्हणून अभ्यासक आणि वक्त्यांसाठी दीपस्तंभ ठरत आहेत. ठाण्याने जपलेल्या आणि वृद्धिंगत केलेल्या या सांस्कृतिक चळवळीमुळेच आज समाजात बहुआयामी वक्ते आणि व्यासंगी अभ्यासक घडू शकत आहेत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

व्यावसायिक यशासोबतच डॉ. बापट यांच्या वैयक्तिक आयुष्यात सामाजिक कार्याची वीणही तितकीच घट्ट आहे. लहानपणापासून समूहात काम करण्याची आवड असल्यामुळे सामाजिक कार्याची ओढ त्यांच्यात सहजपणे रुजली. सासरच्या मंडळींचा खंबीर पाठिंबा असल्यामुळे वैद्यकीय व्यवसाय, दोन मुलींची जबाबदारी आणि सामाजिक उपक्रम या तिन्ही गोष्टी त्यांनी आत्मविश्वासाने सांभाळल्या. वाढत्या ओळखी आणि विस्तारणारे काम यांमुळे त्यांना कधीही ताण जाणवला नाही; उलट या बदलांनी त्यांच्या ऊर्जेसाठी ‘टॉनिक’चे काम केले.

याच सामाजिक बांधिलकीतून त्यांचा हिंदू नववर्ष स्वागत यात्रेशी ऋणानुबंध जुळला. सुरुवातीला कार्यकर्ती म्हणून सहभाग, त्यानंतर महिला विभागाचे नियोजन आणि पुढे निमंत्रक, विश्वस्त ते आज कार्यवाह (सचिव) अशी त्यांची जबाबदारी वाढत गेली. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यामुळे ही भूमिका निभावताना मिळणारा आनंद त्यांच्यासाठी मोलाचा आहे.

त्यांची सामाजिक जाणीवच त्यांना बँकिंग क्षेत्राकडे घेऊन आली, असे त्या मानतात. टीजेएस्‌बी बँकेने यावर्षी साध्य केलेला ₹२५,००० कोटींच्या एकूण व्यवसायाचा टप्पा म्हणजे विश्वास, एकजूट आणि टीमवर्कची फलश्रुती आहे. सर्वच ठिकाणी काम करताना असलेले खेळीमेळीचे वातावरण आणि दृढ विश्वास यामुळेच हा प्रगतीचा वेग शक्य झाला. कामाकडे केवळ ‘नोकरी’ म्हणून न पाहता त्यात आनंद शोधल्यास सेवाभाव आणि कार्यक्षमता दोन्ही वाढतात, हा त्यांचा अनुभव आहे.

महिला सक्षमीकरणासाठी टीजेएस्‌बी बँक सातत्याने पुढाकार घेत असून डॉ. अश्विनी बापट यांची दृष्टी या उपक्रमांना अधिक परिणामकारक दिशा देते. महिला उद्योजकांसाठी नाविन्यपूर्ण योजना, व्याजदरातील सवलती आणि बचत गटांना दिले जाणारे प्रोत्साहन यांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत १४,००० नवीन खाती उघडली गेली असून सुमारे ४०,००० महिलांना याचा लाभ मिळत आहे. महिला रिक्षाचालकांसाठीच्या कर्ज योजनांमुळे स्वावलंबनाच्या संधी अधिक दृढ होत आहेत.

डॉ. बापट सांगतात की, शाखा भेटींदरम्यान त्या कर्मचाऱ्यांना नेहमीच सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करतात. लोकांशी संवाद साधताना जो विचारविनिमय होतो, त्यातून नात्यांची गुंतवणूक तर होतेच, शिवाय बँकेचा व्यवसायही वृद्धिंगत होतो. त्यांच्या मते, नोकरीसोबत सामाजिक सहभाग जोडला की कामामध्ये सहजता आणि अर्थपूर्णता येते.

पुढील पिढीसाठी त्यांचा संदेश अत्यंत सोपा आणि थेट आहे—आपल्या शहराचा अभिमान बाळगा, माणसांशी नाती जपा आणि प्रत्यक्ष संवाद साधा. तंत्रज्ञान संदेश पोहोचवू शकते, पण भावना पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष भेट आणि आपुलकीची देवाणघेवाण अनिवार्य आहे. कुटुंब व्यवस्था मजबूत असेल तर समाजही समृद्ध होईल, असे त्या सांगतात. सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत डॉ. अश्विनी बापट यांचा प्रवास खऱ्या अर्थाने ठाण्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरत आहे.