काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातही सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिलेला नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात बिघडलेली काय सुव्यवस्था आणि अन्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ठाण्यात पोलिसच नव्हे तर, सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षकाचा मृत्यु हा संशयास्पद आहे. पोलिसांवर दबाव आणला जात आहे आणि त्यांना चुकीच्या कारवाया करण्यास भाग पाडले जात आहे, त्यातूनच अशा घटना पुढे येत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने त्यावर अधिक भाष्य करणार नाही. परंतु मला जे काही माहित आहे, ते संशयास्पद आहे. सरकारच्या माध्यमातून दबाव वाढत चालला आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.
आव्हाड यांच्या अंगरक्षकाचा संशयास्पद मृत्यु, काँग्रेसचे पदाधिकारी गिरीश कोळी यांच्यावर झालेला हल्ला आणि ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना आलेली धमकी, याप्रकरणाकडे पोलिस विभाग लक्ष घालत नसेल तर पोलिस विभागावर नेमका दबाब कुणाचा आहे, माफिया की सरकार, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.