टीएमटीच्या मोक्याच्या जागांचा वाणिज्य विकास करणार

परिवहन सेवेचे स्वयंपूर्णतेच्या दिशेने पाऊल; आयुक्तांचे निर्देश

ठाणे: परिवहन उपक्रमाच्या मालकीच्या अनेक जमिनी मोक्याच्या ठिकाणी असून या जमिनीचा विकास परिवहन विभागाच्या गरजा भागाविण्यासोबत वाणिज्य पद्धतीने करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. यातून परिवहन सेवा स्वयंपूर्ण होऊ शकेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

ठाणे परिवहन सेवेचे उत्पन्न कमी झाल्याने गाड्यांची दुरुस्ती, कामगारांची देणी, पगार आदींबाबत सेवेला नेहमीच महापालिकेवर विसंबून राहावे लागते. परिवहनच्या अर्थसंकल्पात नेहमीच महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा वाटा पाहायला मिळतो. हे चित्र बदलण्यासाठी परिवहन सेवेला सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने आयुक्तांनी पाऊल टाकले असून विविध मार्गांनी उत्पन्न वाढवण्याबरोबरच सेवेच्या मालकीच्या मोकळ्या जमिनींचा उत्पन्नाच्या दृष्टीने विकास करण्याबाबत आजच्या आढावा बैठकीत विचार करण्यात आला.

परिवहन उपक्रमाच्या मालकीच्या अनेक जमिनी मोक्याच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी या जमिनीचा विकास परिवहन विभागाच्या गरजा भागाविण्यासोबतच वाणिज्य पध्दतीने केला तर त्यातून कायमस्वरुपी मोठा उत्पन्न स्त्रोत निर्माण होऊ शकेल, त्यासाठी आनंदनगर डेपोपासून सुरूवात करुन त्या जमिनीचा विकास करण्यासाठी ट्रान्झॅक्शन ॲडव्हायझर नियुक्त करण्यात यावेत व त्यांच्या माध्यमातून निविदा बनविण्याचे काम सुरू करण्याचे निर्देशही श्री. बांगर यांनी दिले.

बसेसच्या माध्यमातून जाहिरात करण्यासाठी 11 वेळा निविदा मागवून देखील योग्य प्रतिसाद मिळाला नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे तरी याबाबत एनएमएमटी, बी.एस.टी यांच्या जाहिरातदारांशी तुलना करुन दर निश्चित करावेत व निविदा अधिक स्पर्धात्मक होईल अशा पध्दतीने अटी शर्थीमध्ये बदल करावा जेणेकरुन निविदा यशस्वी होऊ शकेल अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

पर्यावरणपूरक म्हणून परिवहन सेवेने इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून सदर कामाचा ठेका ओलेक्ट्रा या कंपनीस देण्यात आला आहे. यामध्ये एकूण 123 बसेसचा समावेश असून आजवर केवळ 13 बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. परंतु उर्वरित एकूण 110 बसेस पुरवठ्याबाबत संबंधित ठेकेदारांकडून विलंब होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त संबंधित ठेकेदारास करारनाम्याप्रमाणे दंड लावण्यात यावा, तसेच त्यानंतरही वेळेत बसेसचा पुरवठा केला नाही तर भविष्यातील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यापासून प्रतिबंधित का करु नये याचा खुलासा मागवून घ्यावा व आवश्यकता पडल्यास ही कार्यवाही कायम करावी अशा सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

परिवहनमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना व बदलाबाबत वेगवेगळ्या ठिकाणी प्रवाशांची मते जाणून घ्यावीत जेणेकडून त्यांच्याकडून येणाऱ्या सुचनांनुसार आपल्याला कोणते बदल करणे गरजेचे आहे हे समजू शकेल व त्याप्रमाणे आपण बदल करु असेही त्यांनी या बैठकीत नमूद केले.

परिवहन सेवा ठाणेकरांची जीवनवाहिनी आहे, ही बससेवा केवळ ठाणे शहरापुरतीच मर्यादित न राहता बोरिवली, मीरारोड, भिवंडी, मुलुंड, कल्याण आदी भागात पोहचली आहे. तसेच आरामदायी प्रवासासाठी परिवहनच्या ताफ्यात वातानुकूलित बसेस देखील धावत आहेत. परिवहन सेवेच्या माध्यमातून सद्यस्थितीत सुरू असलेले मार्गावरील बसफेऱ्यांची माहिती आज झालेल्या बैठकीत आयुक्तांनी जाणून घेतली. ज्या मार्गावर बसेस धावत आहेत त्याचा संपूर्ण आढावा घेऊन गर्दीच्या वेळी जास्तीत जास्त उपलब्ध होऊन प्रवाशांचा खोळंबा होणार नाही आणि प्रवासी परिवहनच्या बसेसला प्राधान्य देतील या दृष्टीने संपूर्ण सर्व्हेक्षण करुन आवश्यक ते बदल व उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

महापालिकेच्या आस्थापनेवर परिवहनकडून ज्या 56 चालकांची सेवा वर्ग करण्यात आली आहे, अशा वाहनचालकांची सेवा टप्याटप्याने पुन्हा परिवहन सेवेत दाखल करुन घ्यावे असेही निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले. घोडबंदर रोडसारखे लांबपल्ल्याचे आणि गर्दीचे मार्ग या ठिकाणी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात त्याचबरोबर नवीन येणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस प्राधान्याने उपलब्ध करुन द्याव्यात. परिवहन सेवा वापरणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून त्यांना येणाऱ्या अडचणी व उपक्रमाकडील त्यांच्या अपेक्षा याबाबत फीडबॅक घेऊन त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव आपल्या सेवेत होईल याची दक्षता घ्यावी. महिलांना परिवहन सेवेचा लाभ विनासायास घेता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.