मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचा अंबरनाथकरांना विश्वास
अंबरनाथ: अंबरनाथसह बदलापूर आणि परिसरातील नागरिकांना पुरेसे शुद्ध पाणी मिळावे यासाठी धरणांच्या निर्मितीबरोबरच लोकल प्रवासातील गर्दी टाळण्यासाठी मेट्रोची सेवा सुरू केली जाईल, जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे बोलत नाही ते सुद्धा करून दाखवतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी येथे केले.
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीनिमित्त भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, मुंबईलगतच्या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढली, मात्र अशा शहरांचा योग्य नियोजन करण्याचा विसर पूर्वीच्या राज्यकर्त्यांना पडल्याचा टोला मुख्यमंत्री फडणविस यांनी लगावला. 2014 साली भाजपाचे सरकार केंद्रात सत्तेवर आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांसह ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला, याचा अनुभव सगळ्यांना येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबरनाथसह बदलापूर आणि परिसरातील नागरिकांना पुरेसे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पोशिर धरण बांधण्याच्या सूचना पाटबंधारे खात्याला देण्यात आल्या आहेत, ते धरण झाल्यानंतर पुढील अनेक वर्षे पाण्याची काळजी दूर होईल. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या पडणाऱ्या लोकल सेवेत सुधारणा करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल सुरू करणे, मेट्रोच्या कामाला गती देण्याबरोबर मेट्रोच्या दरात लोकल प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे करताना लोकल तिकिटाच्या दरात कोणतीही दरवाढ केली जाणार नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
अंबरनाथची निवडणूक तांत्रिक कारणामुळे लांबली, त्यामुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागला, त्यानिमित अंबरनाथला येऊन भाजपाच्या विकासाचे खरे रूप नागरिकांना सांगण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अंबरनाथला भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्यासह भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडणुकीत संधी द्या, शहर विकासाचे मी बघतो असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, राजेंद्र घोरपडे, नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले आदींची यावेळी भाषणे झाली.
वनमंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गुलाबराव करंजुले-पाटील, आदी याप्रसंगी उपस्थित होते.