नवघर पोलीस ठाण्यात आ. गीता जैन यांचे ठिय्या आंदोलन

भाईंदर : आ. गीता जैन यांचा फोटोग्राफर हर्ष शहा विरोधात नवघर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकाराची माहिती मिळताच आ. गीता जैन यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नवघर पोलीस ठाण्यात धाव घेत ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी फोटोग्राफरला सोडल्यावर गीता जैन यांनी आंदोलन संपवले.

मीरा-भाईंदर मतदारसंघात मुख्यतः भाजपचे नरेंद्र मेहता, अपक्ष आ. गीता जैन व काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन या तिघांमध्ये लढत असून एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांविरुद्ध सोशल मिडीयाद्वारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काँग्रेसच्या मुझफ्फर हुसेन विरोधात बनावट स्वाक्षरी व पत्रकाचा व्हिडीओ व्हायरल होताच पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आ. गीता जैन यांच्या कार्यकर्त्याने महिलेविरोधात पोस्ट व्हायरल करताच मिरारोड पोलीस ठाण्यात भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात सदर कार्यकर्त्यास मारहाण केली. सदर प्रकरणी दोन्ही पार्टीविरोधात कारवाई करण्यात आली.

आज (सोमवार) आ. गीता जैन यांच्या फोटोग्राफर ला नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकाराची माहिती मिळताच आ. गीता जैन यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नवघर पोलीस ठाण्यात धाव घेत फोटोग्राफरला सोडल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका घेत ठिय्या आंदोलन सुरू केले. नवघर पोलिसांनी घटनेची दखल घेत फोटोग्राफरला सोडण्याचे आश्वासन दिल्याने आ. गीता जैन यांनी पोलीस ठाणे सोडले. मात्र काही वेळ आ. गीता जैन यांच्या भूमिकेने नवघर पोलीस ठाण्यात धावपळ सुरू होती.