ठाण्यात थंडीचा उकाडा!

ठाणे: फेब्रुवारी महिन्यातच ठाणे शहरात उन्हाची तीव्रता जाणवू लागली असून, ऐन हिवाळ्यातही नागरिकांना उष्णतेचा चटका बसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहराचे कमाल तापमान ३५ अंशांवर असून, अपेक्षित गारवा पूर्णपणे गायब झाला आहे. ही परिस्थिती केवळ ऋतूबदलाची नसून, वाढते शहरीकरण, घटती हिरवळ आणि हवामान बदलाचा इशारा असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात.

ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी रोजी शहराचे कमाल तापमान ३५.६ अंश, तर किमान तापमान २३.४ अंश नोंदवले गेले. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३५.२ अंश, तर किमान तापमान २४.१ अंश इतके राहिले. हिवाळ्यात अपेक्षित असलेली गारवा पूर्णपणे गायब झाल्याचे चित्र आहे.

पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, वाढती शहरीकरणाची गती, झपाट्याने कमी होणारी हिरवळ, वाहनांची वाढती संख्या, काँक्रिटीकरण आणि हवामान बदल यांचा थेट परिणाम तापमानवाढीवर होत आहे. “हिवाळा संपण्याआधीच उन्हाळा जाणवू लागणे ही गंभीर बाब असून, भविष्यात उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

बदलत्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर, वृक्षसंवर्धन, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे ही काळाची गरज बनली आहे.

हिवाळ्यातही ३५ अंश तापमान नोंदवले जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. हा अचानक बदल निसर्गाचा इशारा असून, वाढते काँक्रिटीकरण, झपाट्याने नष्ट होणारी हिरवळ आणि वाहनांची वाढती संख्या याचे थेट परिणाम आपण अनुभवत आहोत. जर शहरांनी वेळीच पर्यावरणपूरक धोरणे स्वीकारली नाहीत, तर अशा असामान्य तापमानवाढीची सवयच लावून घ्यावी लागेल. आज जाणवणारी उष्णता ही केवळ हवामानाची नाही, तर मानवी बेफिकिरीची जळजळ आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी व्यक्त केले आहे.