कोळशावर चालणाऱ्या बेकरी आणि तंदूर भट्ट्यांना सील ठोकणार

ठाणे: ठाणे शहरातील पारंपरिक कोळश्यावर सुरु असलेल्या बेकरी आणि तंदूर भट्टी बंद न करणाऱ्या आस्थापना १५ दिवसांत सील करण्याचा इशारा ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने दिला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशानुसार बेकरी व तंदूर पदार्थ बनविणाऱ्या हॉटेलचालकांनी इंधनासाठी कोळसा व लाकडाचा वापर न करता पर्यावरणपूरक असलेल्या एलपीजी, पीएनजी ‍किंवा ‍विजेचा वापर करणे बंधनकारक असून याबाबत मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेत पर्यावरण विभागातर्फे नमुद करण्यात आले की, प्राथमिक सर्वेक्षणामध्ये ठामपा क्षेत्रात एकूण ४७ बेकरी असून, त्यापैकी ३० बेकऱ्या इलेक्ट्रिक इंधनावर सुरू आहेत. या कार्यशाळेमध्ये बेकरी असोसिएशन व हॉटेल असोसिएशन यांनी त्यांचे अर्ज गॅस जोडणीसाठी बऱ्याच काळापासून प्रलंबित असल्याचे मत व्यक्त केले, तसेच नवीन इंधनावर स्थलांतरीत करताना बेकरी निष्कासन करण्यासाठी जास्त खर्च जास्त वेळ लागल्याचे नमूद केले. त्यावर महानगर गॅस वितरण यांनी प्रलंबित बेकरी व हॉटेल यांची जीपीएस माहिती असलेला तक्ता देण्याची विनंती केली. त्याबाबत पुढील १५ दिवसांत लवकरच सर्वेक्षण करून सुसाध्यता तपासण्यात येईल, असे सांगितले. त्याचबरोबर १५ दिवसांत पारंपरिक भट्टी बंद न करणारे हॉटेल आणि बेकरी मालकांना नोटीस पाठवून त्यांना सील ठोकण्यात येईल, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या कार्यशाळेस बेकरी व हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी, एफएसएसआय प्रतिनिधी, महानगर गॅस वितरणचे प्रतिनिधी मुकेश पनोत्रा, एलपीजीचे प्रतिनधी सचिन जाधव आणि एचपीसीएलचे विभागीय अधिकारी मुकुल अहुजा उपस्थित होते. ठाणे महापालिकेतर्फे मुख्य अग्निशमन अधिकारी, परवाना विभाग, पर्यावरण विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते.