* रेल्वे बोर्डाकडून आर्थिक तरतुदीला मान्यता
* २०२९पर्यंत नवीन स्थानक सेवेत
ठाणे: मागिल अनेक वर्षे रखडलेल्या ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या विस्तारीत रेल्वे स्थानकाचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतीच रेल्वे बोर्डाने आर्थिक तरतूद करण्यास मान्यता दिली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचा भार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या रेल्वे स्थानकातून रोज किमान दहा ते १२ लाख प्रवासी प्रवास करत असतात, त्यामुळे मुलुंड आणि ठाणे दरम्यान मनोरुग्णालयाच्या जागेवर विस्तारित रेल्वे स्थानक उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता, त्याला मंजुरी देखिल मिळाली होती.
नवीन स्थानक परिसराचा विकास स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत ठाणे महापालिकेने केला असून रेल्वे स्टेशन बांधण्याची जबाबदारी रेल्वेकडे देण्यात आली होती. त्याकरिता ठाणे महापालिका रेल्वे प्रशासनाला १९० कोटी रुपये देणार होती, परंतु मागिल काही वर्षे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट बनल्याने महापालिकेने रेल्वे प्रशासनाला आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती, परंतु रेल्वे मंत्रालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मागिल काही वर्षे रेल्वे स्थानकाचा प्रश्न प्रलंबित होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खा. नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची मागिल वर्षी २४ जुलै रोजी भेट घेऊन आर्थिक भार उचलण्याची विनंती केली होती, त्याला यश आले असून मार्च महिन्याच्या शेवटच्या बैठकीत विस्तारीत रेल्वे स्थानकाकरिता रेल्वे २५६ कोटींचा निधी देणार असून त्याची निविदा देखिल रेल्वे मंत्रालय काढणार आहे. ठाणे महापालिका या कामावर देखरेख ठेवण्याचे काम करणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले असून पुढील २०२९ पर्यंत हे रेल्वे स्थानक ठाणेकरांच्या सेवेत दखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चौकट
हे रेल्वे स्थानक झाल्यानंतर ठाणे स्थानकाचा भार कमी होईल. वागळे, घोडबंदर, वर्तकनगर, वसंत विहार या भागातील नागरिकांचा प्रवास काही मिनिटांवर येणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी देखिल निम्यावर येऊन प्रवाशांचा प्रवास जलद आणि समाधानकारक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.