ठाणे: ठाण्यात तब्बल ८३,६४४ दुबार मतदार आढळले आहेत. या दुबार मतदारांची साफसफाई सुरू असून ही नावे वगळण्याचे काम अंतिम टप्प्यात आहेत. येत्या दोन दिवसांत या दुबार मतदारांचा फैसला होणार आहे. दरम्यान, ८३ हजारपैकी किती नावे वगळण्यात येणार? याकडे अनेक राजकीय पक्षासह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिकेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दुबार मतदारांची यादीच काही दिवसांपूर्वी जाहीर केली. ठाणे पालिकेच्या एकूण ३३ प्रभागांत ही दुबार नावे असल्याची कबुलीच प्रशासनाने एकप्रकारे दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या बेफिकीर कारभारावर टीका होऊ लागली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे यांनी देखील दुबार नावावरुन निवडणूक आयोग आणि महापालिकेच्या कारभाराविषयी पत्रकार परिषद घेत भंडाफोड केला. तसेच मतदार यादीतील घोळावरुन मनसेने देखील आंदोलन करीत महापालिकेवर टीकेची झोड उठवली होती. दुबार नावे तत्काळ रद्द करण्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर ठाणे महापालिकेने दुबार नावे वगळण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.
ठाण्यात एकूण १६ लाख ४९,८६७ मतदार मतदान करणार आहेत. एकूण ३३ प्रभागांकरीता प्रभागनिहाय मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रशासनाने प्रसिद्धही केली आहे. त्यात ८३,६४४ दुबार मतदार असून लवकरच या नावांचा फैसला होणार आहे.