शास्त्रीय नृत्याला पाश्चात्य संगीताचा साज

ठाणे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रसिकांच्या प्रतिसादात कलाकल्प – द आर्ट स्टुडिओ या संस्थेचा ‘प्रयास’ हा कार्यक्रम दिमाखात पार पडला.

ठाणेवैभव माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमात कथ्थक नृत्यांगना मंजिरी वाठारे यांच्यासह त्यांच्या ५० हून अधिक शिष्यांनी आपली नृत्यकला सादर केली. त्यांना विवेक मिश्रा (तबला), श्रीरंग टेंबे (संवादिनी), प्रतीक पंडीत (सितार) तसेच ईशानी साठे यांनी पढंतची साथ केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात जयपूर घराण्याचे ज्येष्ठ कथ्थक नृत्य कलाकार पं. राजेंद्र गंगाणी आणि बॉलिवूड तसेच पाश्चात्य संगीतात विशेष योगदान असणारे जगविख्यात ड्रमर रणजित बारोट यांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती सादर केली. त्यांच्या या अनोख्या प्रयोगामध्ये पं. फतेहसिंग गंगाणी (तबला), श्रीरंग टेंबे (गायन), संदीप मिश्रा (सारंगी), गुलराज सिंग (कीबोर्ड) तसेच राल्फ मेनेंजेस (बेस गिटार) यांचा सहभाग होता.

‘प्रयास’च्या माध्यमातून शास्त्रीय नृत्यातील जयपूर घराण्याच्या तीन पिढ्यांनी एकाच मंचावर आपली कला सादर करून रसिकांना गुरुभक्ती आणि गुरुकृपा या दोन्हीचा अनुभव दिला. कार्यक्रमाचे निवेदन विघ्नेश जोशी यांनी केले, तर या देखण्या आणि भव्य सोहळ्याचे संपूर्ण व्यवस्थापन शिवरंजनी एंटरटेनमेंटच्या रवी नवले यांचे होते.

“भविष्यात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील ऋषीतुल्य दिग्गज कलाकारांच्या प्रस्तुती, कलाउपासकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन,” असे वचन, कलाकल्पच्या संचालिका मंजिरी वाठारे यांनी आपल्या मनोगतात ठाणेकर रसिकांना दिले.