द्रोणागिरी नोडमधील लाभार्थ्यांना भूखंडाचे इरादापत्र
नवी मुंबई: उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिडकोच्या १२.५टक्के योजनेअंतर्गत द्रोणागिरी नोडमधील ३१९ पात्र लाभार्थ्यांना मंगळवारी इरादापत्राचे वाटप करण्यात आले.
सिडकोतर्फे सदर भूखंडांसाठी सोडत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय दिनांक ११ जून २०२५ रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. द्रोणागिरी नोडमधील प्रकल्पबाधितांसाठी शेवटची सोडत सन २००७ मध्ये घेण्यात आली होती.
यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव नवीन सोना, सह- व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, सिडको, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी, सिडको, संदीप निचित आणि मुख्य भूमी व भूमापन अधिकारी, सिडको, दिपक आकडे आणि पात्र लाभार्थी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमधील ३१९ पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी इरादापत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रालयातील दालनात उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात इरादापत्रांचे वाटप करण्यात आले.
ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उरण तालुक्यातील ९५ गावातील जमिनी संपादित करताना त्यांना १२.५टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेअंतर्गत ९४ टक्के लाभार्थ्यांना भूखंडांचे वितरण पूर्ण झाले होते. तर उर्वरित ५.५९टक्के भूखंडाचे वाटप शिल्लक होते. त्यामुळे या नोडमधील ३१९ पात्र लाभार्थ्यांना १२.५टक्के भूखंड वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानुसार या पात्र लाभार्थ्यांना एक लाख ९० हजार चौरस मीटर भूखंड क्षेत्राचे वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ३१९ पैकी २४ पात्र लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात इरादापत्रांचे वाटप करण्यात आले.