सिडकोने जाहीर केली ५२९ अनधिकृत बांधकमांची यादी

नवी मुंबईत २७७ तर उरण पनवेलमध्ये २२५ अनधिकृत बांधकामे

नवी मुंबई: सिडको हद्दीतील नवी मुंबई शहरातील ५२९ अनधिकृत बांधकामांची यादी सिडकोने प्रसिद्ध केली आहे. यात नवी मुंबई मनपा क्षेत्र २७७ तर पनवेल उरण क्षेत्र २५२ संबंधित बांधकाम धारकांना एमआरटीपी अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी फसगत होऊ नये म्हणून या इमारतींमध्ये घरे, दुकाने खरेदी करू नयेत असे आवाहन सिडकोने केले आहे.

नवी मुंबई शहरातील घरांना चांगली किंमत मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरे घेणे परवडत नाही. अशा नागरीकांच्या घरांची निकड पाहता शहरात भूमाफिया विनापरवाना घरे बांधून ती स्वस्त घरांच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारतात. ही घरे उभी राहण्यास स्थानिक प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची फुस असते. मात्र न्यायालयीन कारवाईचा ससेमीरा मागे नको म्हणून थातुर मातुर कारवाई केली जाते. कारवाईनंतर यातील बहुतांश इमारती पुन्हा उभ्या राहत आहेत.

नवी मुंबई शहरात आजही जमीनमालक म्हणून सिडको आहे. त्यामुळे अशा अनधिकृत बांधकामांवर सिडको देखील कारवाई करत असते. तरी देखील अशी बांधकामे सुरुच आहेत. खोटी प्रलोभने दाखवून आणि स्वस्त दरात अनधिकृत इमारतीमधील घरे विकली जात आहेत. अशा घरांसाठी सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची कमाई खर्च करत आहेत. अनधिकृत इमारतींवर कारवाई केल्यानंतर सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे सिडको हद्दीतील नवी मुंबई शहरातील ५२९ अनधिकृत बांधकामांची यादी सिडकोने प्रसिद्ध केली आहे. यात नवी मुंबई महानगर पालिका हद्दीत २७७ तर उरण पनवेल भागात २५२ अनधिकृत बांधकामे असून अशा इमारतींमध्ये घरे, दुकाने खरेदी करू नयेत असे आवाहन सिडकोने केले आहे.

सिडको हद्दीतील विभागवार अनधिकृत बांधकामे

नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्र
नेरूळ-३४, कोपरखैरणे-८९, वाशी-३, घणसोली-७२, सानपाडा-२३, ऐरोली-११, बेलापुर-४५

पनवेल उरण क्षेत्र
खारघर-१४, कामोठे-१३, कळंबोली-३७, तळोजा-१, उलवे-४०, पनवेल-२२,करंजाडे-१२, उरण, द्रोणगिरी-११३