* स्थानक उभारणीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती
* बांधकामासाठी ७३.९२८ कोटी खर्च
अंबरनाथ: बदलापूर आणि अंबरनाथ रेल्वे स्थानकांमध्ये नव्याने चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्थानक उभारणीसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ७३.९२८ कोटी रुपये खर्चाचा कार्यादेश देण्यात आला आहे. आता स्थानकाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे तसेच शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर हे या स्थानकाच्या उभारणीसाठी सातत्याने आग्रही होते. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे स्थानक उभारणीचे काम मार्गी लागत आहे. विष्णू प्रकाश पुंगलीया कंपनीला हे काम देण्यात आले असून मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) कडून याबाबत कंपनीला स्वीकृती पत्र देखील देण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा भार पाहता या दोन्ही शहरांच्या मध्यस्थानी चिखलोली रेल्वे स्थानक असावे अशी गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिक नागरिकांची मागणी होती. रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी जमीन, स्थानक उभारणीसाठीच्या विविध टप्प्यांवरील मंजुरी अशा नानाविध अडचणींचा डोंगर पार करत चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम दृष्टीपथात आले आहे. यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार तसेच बैठका घेत पाठपुरावा केला होता. याचबरोबर स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर देखील यासाठी आग्रही होते. त्यांच्या या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चिखली रेल्वे स्थानकाची भरण्याची काम प्रत्यक्ष मार्गे लागले असून येत्या कालावधीत हे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे दोन्ही शहरातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कायम गर्दी दिसून येत असते. याच पार्श्वभूमीवर दोन्ही शहरांच्या मध्यस्थानी चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या स्थानकाच्या उभारणीनंतर अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकावरील प्रवासी भार देखील कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
चिखलोली रेल्वे स्थानकात जिने, पुल आणि जमिनीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून ऑक्टोबर महिन्यात ८१.९३ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया मार्गी लागून स्थानकाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार होते. आता रेल्वे प्रशासनाकडून फलाट, शेड, पिलर, विद्युत वहिनी आणि इतर कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. ही प्रक्रिया पार पडली असून लवकरच ७३.९२८ कोटी रुपयांच्या निधीतून स्थानक उभारणीचे प्रत्यक्ष काम आता सुरू होणार आहे. यासाठी सबंधित कंपनीला मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड कडून स्वीकृती पत्र देखील देण्यात आले आहे.
गेल्या अनेक दशकांपासून चिखलोली रेल्वे स्थानकाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. लवकरच स्थानकाची उभारणी होऊ ते सेवेत येईल. त्याला लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार असून चिखलोली, अंबरनाथ आणि विस्तारीत बदलापुरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
– डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा