ठाणे : ठाण्यावरची पकड कायम ठेवण्यासाठी शहरात मुख्यमंत्री कार्यालय उभे राहणार आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेत मुख्यमंत्री कार्यालय असा उल्लेख आहे. या मुख्यमंत्री कार्यालयात पालिका आयुक्तांच्या कार्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे. या कार्यालयातून ठाणे महापालिकेच्या कारभारावर तसेच ठाण्यात सुरु असलेल्या विकासकामांवर थेट मुख्यमंत्र्यांचा वॉच असणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आता कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील वागळे इस्टेट येथील कशिश पार्क भागात नवीन कार्यालय उभे राहणार आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून चार कोटी ६० लाखांचा खर्च केला जाणार आहे. या कार्यालयामुळे शिंदे यांची नजर थेट महापालिकेच्या कारभारावर आणि मतदारांवर देखील राहणार आहे. याच कार्यालयाच्या इमारतीत ठाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालयही बांधण्यात येणार आहे.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईतील वर्षा निवासस्थानी राहत नसून ठाण्यातही त्यांचे लुईसवाडी येथे शुभ दिप बंगल्यात निवासस्थान आहे. त्यांची सर्व कामे येथूनच होत आहेत. त्यांच्या घराला देखील कार्यालयाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या नगर अभियंता यांच्या वतीने बांधकाम व फर्निचर, मुख्यमंत्र्यांसह कृषी विभागाचे कार्यालय आणि महापालिका आयुक्त कार्यालयाचे बांधकाम, विद्युतीकरण आणि संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी ४ कोटी ६० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. ३ मे रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत निविदा भरता येणार असून ते ८ मे रोजी ती उघडली जाणार आहे.
ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विविध महत्त्वाचे प्रकल्प प्रत्यक्षात आणायचे आहेत. मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांचे कार्यालय एकाच मजल्यावर असणार आहे. अशा स्थितीत महापालिकेच्या कारभारावर शिंदे यांची पकड कायम राहणार असून, त्याचा फायदा त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत मिळू शकेल, अशी चर्चा आहे.