चेंदणी पादचारी पुल अचानक बंद; नागरिकांची गैरसोय

ठाणे : नोकरदार, विद्यार्थी आणि महिला ज्येष्ठ नागरिक आदी सर्वांसाठी महत्वपूर्ण असलेला आणि चेंदणी कोळीवाड्यातून जाणारा पादचारी पुल धोकादायक झाल्यामुळे अचानक बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्यामुळे ठाणे पूर्वेतील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांमध्ये म. रेल्वेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजीचा सूर आहे.

परळ येथील रेल्वेचा जुना रेल्वे पूल कोसळल्यानंतर मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील सर्व पुलांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये चेंदणी कोळीवाड्यातील पादचारी पूल धोकादायक असल्याचे निदान करण्यात आले होते.
चेंदणी कोळीवाड्यातून जाणारा हा पुल स्थानिकांसाठी दैनंदिन कामासाठी महत्वाचा होता. सण उत्सव साजरे करताना कोळी बांधवांसाठी प्रमुख वहिवाट असणारा हा पूल नित्याच्या रहदारीसाठी बंद झाल्यामुळे आता प्रवाशांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असे एका रहिवाशाने सांगितले.

ठाणे ते वाशी ट्रान्स हार्बर रेल्वे सुरू झाल्यावेळी मध्य रेल्वेने जुना पादचारी पुल तोडला आणि सुमारे २० वर्षांपूर्वी नवा पादचारी पुल बांधण्यात आला आहे. ठाणे पूर्वेतील कोपरी, मीठबंदर रोड, कोपरी आदी भागातील नागरिक या पुलावरून पश्चिमेला जात होते. पंरतू, दिवाळीच्या आधी हा पुल अधिसूचना न देताच रेल्वेने बंद केला आहे. त्यामुळे ठाणे पूर्वेतील रहिवाशांना पश्चिमेला जााण्यासाठी कमालीचे त्रासदायक झाले आहे, असे चेंदणी कोळीवाड्यातील रहिवासी आनंद कोळी म्हणाले.

अचानक पुल बंद केल्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ठाणे पूर्वेतून जाणारे विद्यार्थी, नोकरदार, महिला आदी सर्वांची पश्चिमेला जाण्यासाठी त्रेधाधिरपीट उडत आहे. रहदारीसाठी रेल्वे पुलाचा वापर करावा लागत असला तरी, रेल्वे तिकीट नसल्यास टीटी पकडेल याची कायम धाकधूक मनात असते, असे भूपेंद्र कोळी यांनी सांगितले.

ब्रिटिश काळात चेंदणी कोळीवाडा हे एक गाव होत. पुढे बोरीबंदर ते ठाणे ही पहिली रेल्वे गाडी सुरु झाल्यानंतर चेंदणी कोळीवाडा ठाणे पूर्व पश्चिम विभागले गेले. यावेळी पूर्व पश्चिमेला जोडण्यासाठी रेल्वेने पादचारी पुल बांधला. दरवर्षी कोळीवाड्यात सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे करताना हा पुल महत्वाचा ठरतोच. काहीवेळा अंत्ययात्रादेखील या पुलावरून आणली जाते. मात्र आता हा पुल बंद झाल्यामुळे रहिवाशांपुढे यक्षप्रश्न उभा ठाकला आहे,असे पूर्वेकडील चेंदणी कोळीवाडा सुरेन कोळी यांनी सांगितले.

पादचारी पूल जुना आणि धोकादायक झाल्यामुळे बंद करण्यात आला आहे. जवळच नवीन पादचारी पुलाचे काम सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मनासपुरे यांनी दिली.