ठाणे : ठाण्यात पहिल्यांदाच चरस (हशीश) ऑईल विक्री करणा-या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात गांजासह गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.
ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता वागळे इस्टेट इंदिरानगर भाजी मार्केटजवळ ऋषभ भालेराव नावाची व्यक्ती गांजा अंमली पदार्थ त्याच्या गि-हाईकांना विक्री करण्यासाठी येणार होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे आणि पोलिस अंमलदार यांनी इंदिरानगर भाजी मार्केटजवळ वागळे इस्टेट येथे सापळा रचला. त्यावेळी शहापूर येथील रहिवासी असलेला भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीस हजार दोनशे रुपये किमतीचा एक किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा पदार्थ आणि 12,700 रुपये किमतीचा मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 42,900 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्या विरुद्ध वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे
आरोपीची केलेल्या तपासामध्ये त्याच्या बदलापूर येथील घरातून आणखी 59 किलो 500 वजनाचा गांजा व 290 ग्रॅम चरस व 19 छोट्या बाटल्या चरस (हॅश आॅईल) व इतर वस्तू असा एकूण 31 लाख 22 रुपये किमतीचा अंमली पदार्थाचा साठा हस्तगत केला आहे. हा आरोपी ‘इंस्टाग्राम अॅप’वरून ऑनलाईन अंंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. इन्स्टाग्रामवर येणा-या ऑर्डरचे ऑनलाइन पैसे मिळाल्यानंतर कुरियरमार्फत होम डिलिव्हरी करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आरोपीची 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने (गुन्हे शाखा घटक पाच) हे वागळे करत आहेत.