सहा महिन्याचा सश्रम कारावास
ठाणे : तीनहात नाका येथील नामांकित व्यापारी संकुल संलग्न गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन विलास पवार (५२) यांना विनयभंग प्रकरणी ठाणे प्रथम वर्ग न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.आय.सूर्यवंशी यांनी न्यायालयासमोर सादर साक्षीपुरावे ग्राह्य धरून सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा धक्कादायक प्रकार ११ फेब्रुवारी २०२० मध्ये सदर व्यापारी संकुलाच्या कार्यालयात घडला होता.
फिर्यादी महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर त्या ४ डिसेंबर, २०१९ रोजी या ठिकाणी कामाला लागल्या होत्या. याचा फायदा उठवत चेअरमन विलास पवार या महिलेला मानसिक त्रास देत असे. वारंवार काहीही काम नसताना कॅबिनमध्ये बोलावून उभे करून ठेवायचा, कॅबिनच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न केल्यास कामावर काढून टाकण्याचा तसेच रिमार्क मारण्याची धमकी देत असे. ११ फेब्रुवारी २०२० रोजी पुन्हा फिर्यादी महिलेला त्रास दिला. यावेळी आरोपी चेअरमन पवार याने महिलेशी लगट करीत आक्षेपार्ह वर्तन केले. याबाबत कुणाला सांगितल्यास तिला आणि तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
त्यानंतर पिडीत महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून पवार याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या खटल्याची अंतिम सुनावणी नुकतीच होऊन न्या. सूर्यवंशी यांनी चेअरमन पवार याला दोषी ठरवीत सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.