शिक्षण विभागाने मागविला सर्व उपसंचालकांकडून तातडीचा अहवाल
ठाणे : वाढत्या उष्णतेचा विचार करत सीबीएसई, आयसीएसई शाळांचे वेळापत्रक राज्य शासनाच्या शाळांच्या वेळाप़त्रकाप्रमाणे करण्याची मागणी मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी केली होती. यासंदर्भात शिक्षण संचालनालयाने शिक्षण उपसंचालकांना पत्राद्वारे अभिप्राय मागितला असून यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप होत नाही. त्यामुळे त्यांच्या शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार करत येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. बदलत्या हवामानानुसार गेल्या काही वर्षात हवेतील उष्मा वाढत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेत सीबीएसई, आयसीएसई शाळांचे वेळापत्रक राज्य शासनाच्या शाळांच्या वेळाप़त्रकाप्रमाणे करणे आवश्यक आहे. पालकांना देखील उन्हात शाळा भरताना किंवा सुटताना उभे राहावे लागते. यासाठी उन्हाळी सुट्टीमध्ये बदल करायला हवा अशी मनविसेकडे समस्या मांडली होती. त्यानंतर गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी निवेदन दिले होते. याबाबत शिक्षण संचालनालय पुणे येथून सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना त्वरित अभिप्राय सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा परीक्षा मार्च अखेर संपल्यानंतर एप्रिल, मे महिन्यात बंद असतात. गेल्या काही वर्षापासून मार्च, एप्रिल महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढत आहे. बहुतांश शहरांमध्ये ४० अंशाच्या वर तापमान आहे. ठाण्यात एप्रिल महिन्यात ४३.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा एप्रिल महिना संपेपर्यंत चालू असतात. काही शाळांमध्ये पंखे देखील नादुरूस्त असतात. लहान मुले पाणी पिण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे एखादया विद्यार्थ्याला उष्माघाताचा त्रास झाल्यास दुर्घटना घडू शकते, असे संदीप पाचंगे यांनी सांगितले.