मांजर आणि श्वानांचा रॅम्पवर ‘लय’दार वॉक

‘ठाणे पेट फेस्टिव्हल’ला प्राणीप्रेमींचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ठाणे: ठाणे शहरात ‘डॉग्ज वर्ल्ड इंडीया’ या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’ला प्राणीप्रेमींनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

या फेस्टिव्हलमध्ये पाळीव प्राण्यांच्या विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीराबरोबरच श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा आणि फॅशन शो असे कार्यक्रम झाले. श्वान, मांजर, पक्षी आणि माशांच्या विविध प्रजातीही ठाणेकरांना पहावयास मिळाल्या. ठाणे शहरात ‘डॉग्ज वर्ल्ड इंडीया’ या संस्थेच्या माध्यमातून शनिवार आणि रविवार या दिवशी ‘ठाणे पेट फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय फेस्टीवलमध्ये पाळीव प्राण्यांची विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. श्वानांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. श्वान आणि मांजरींचा फॅशन वाॅक, एक्झाॅटिक ब्रीड शो, खेवरा सर्कल ते कार्यक्रम स्थळापर्यंत पेट रन, ट्विन वाॅक, ब्रीड फेस्टीवल, असे कार्यक्रमही पार पडले. या फेस्टीव्हलमध्ये ८०० हून अधिक पाळीव प्राणी त्यांच्या पालकांसोबत सहभागी झाले होते. या फेस्टीव्हलला १० ते १२ हजार प्राणीप्रेमींनी भेट दिल्या असून त्यांनी विविध खेळाच्या स्पर्धेच्या माध्यमातून श्वानांची चपळता, चालाखी आणि आज्ञाधारकता अनुभवली. श्वानांचे ३६० डीग्री फोटो शूटची आणि सेल्फीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. याठिकाणीही श्वानांचे फोटो काढण्यासाठी त्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती.

श्वानांच्या प्रजाती आणि श्वानांचा वयोवृद्ध, गतीमंद आणि रुग्णांकरीता होणारा थेरोपी वापर याविषयी तज्ज्ञांमार्फत माहिती देण्यात आली. प्रशिक्षित श्वानांचे संचलन, सैन्य दलातील श्वान प्रशिक्षकांनीही फेस्टीव्हलला उपस्थिती लावून श्वानाला कसे हाताळावे याविषयी माहिती दिली. याशिवाय, श्वान, मांजर, पक्षी आणि माशांच्या विविध प्रजातीही ठाणेकरांना पहावयास मिळाल्या. याठिकाणी विविध खाद्यपर्थांचे व पेय स्टाॅल लावण्यात आले होते. तिथेही खाद्यपदार्थांची चव नागरिकांनी चाखली.

फेस्टिवलमध्ये लॅब्राडॉर, गोल्डन रिट्रिव्हर, कोली, सैबेरिअन हस्क, पुडल, बॉक्सर, डॉल्मेशिअन, कॉकर स्पॅनिअल, स्पिट्झ, अफगाण हाउंड, बेल्जियन मॅलीनॉईस, जर्मन शेफर्ड, डॉबरमन, रॉटविलर, ग्रेटडेन, मॅस्टीफ, सेंट बर्नार्ड, पग, बिगल, डशहाउंड, मिनिएचर पिसिंचर, शिझू, पॉमेरिअन, मल्टिस, शिबा इनु, चिवाव्हा, या प्रजातीच्या श्वानांचा तर, मैनकुन, पर्शियर, इंडीमाऊ, मियामीज आणि बंगाल, या प्रजातीच्या मांजरी होत्या.