* ५१४३ रुग्णांच्या तपासण्या
* ५३ व्यक्ती संशयित कर्करुग्ण
ठाणे: ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेल्या कर्करोग निदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. वेळीच निदान होऊन पुढील उपचार घेणे या रुग्णांना सोयीचे होणार आहे. त्यामुळे ही सेवा रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरू लागली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात ५१४३ रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या तर ५३ व्यक्ती संशयित कर्करुग्ण आढळून आल्या.
जिल्ह्यात फिरत असलेली कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन अल्पावधीत हजारो नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम ३ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कर्करोगाचे लवकर निदान करून नागरिकांना तत्काळ उपचाराखाली आणणे, मार्गदर्शन करणे, तसेच कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे. कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक होतात, या कारणामुळे हा उपक्रम जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे. विविध गावांमध्ये फिरणाऱ्या या व्हॅनद्वारे मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग या प्रमुख तीन कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार तपासण्या पार पडल्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ ते २९ नोव्हेंबर २०२५ या काळात २४४१ नागरिकांच्या मुख कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या. १४९२ महिलांच्या स्तन कर्करोग आणि १२१० महिलांच्या गर्भाशय मुख कर्करोग तपासण्या अशा एकूण ५१४३ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यापैकी तपासलेल्या नमुन्यांमध्ये पाच मुख कर्करोग संशयित, ३४ स्तन कर्करोग संशयित आणि १४ गर्भाशय मुख कर्करोग संशयित अशा एकूण ५३ व्यक्ती संशयित कर्करुग्ण आढळून आल्या आहेत. त्यापैकी आठ जणांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांनी गावोगाव नागरिकांना या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींचा देखील सक्रिय सहभाग होता.