मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १० पासून प्रचारबंदी लागू

ठाणे: राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये मतदानापूर्वी लागू असलेल्या निवडणूक प्रचारबंदीच्या नियमांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे.

विविध आदेश व अधिनियमांमध्ये भिन्न उल्लेख आढळत असल्याने या तरतुदी एकसमान करण्याच्या उद्देशाने आयोगाने प्रचार थांबविण्याची वेळ निश्चितपणे मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री १० पर्यंत केली आहे. ठाणे जिल्हयातील नगरपारिषदांचे मतदान २ डिसेंबर २०२५ रोजी आसल्याने सुधारित अदेशानुसार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० नंतर सभा, मोर्चे, ध्वनीक्षेपाचा वापर करता येणार नाही, प्रचार बंद होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५’ मधील कलम २३ नुसार मतदानाच्या दिवशी कोणतीही जाहिर सभा आयोजित करणे, भरविणे किंवा त्यात सहभागी होणे प्रतिबंधित आहे. मतदानादिवशी शांतता राखण्यासाठी ही तरतूद लागू आहे.

९ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या “प्रसार माध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५” मध्ये मतदानाच्या एक दिवस आधी रात्री १२ पासून प्रचारबंदी लागू असे नमूद होते. तसेच ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या ‘आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश’ मध्ये मतदानाच्या २४ तास आधीपासून प्रचारबंदीचा उल्लेख होता. विविध आदेशांतील या वेळेतील फरकामुळे निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत होता.