मोहीम फत्ते; विजेचे दोन जुने मनोरे पाडले

अंबरनाथ: गेल्या सुमारे ४० वर्षांपासून शाळेच्या परिसरात उभे असलेले पण वापराविना पडून असलेले विजेचे दोन मनोरे आज अखेरीला पाडण्यात आले. यासाठी आज महावितरण आणि रेल्वेतर्फे मोहीम संयुक्त राबवण्यात आली. मनोरे पाडल्याने शाळेतर्फे समाधान व्यक्त करण्यात आले.

कल्याण-बदलापूर महामार्गावरील अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील महात्मा गांधी विद्यालयाच्या आवारात एक आणि संरक्षण भिंतीला लागून असलेला एक असे २५ मीटर उंचीचे दोन मनोरे विद्युत वाहिनीसह सुमारे ४० वर्षे जुने होते. त्यातून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह होत नव्हता. महावितरणतर्फे आज शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी दोन्ही मनोरे पाडण्यात आले.

विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता धनंजय औन्धेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले , सतीश कुलकर्णी, नारायण मार्लेगावकर , अलका कावळे, भास्कर कोळे, सुनील गायकवाड त्याचप्रमाणे रेल्वेतर्फे वेद प्रकाश साहू, शैलेंद्र सेठी, नगरपालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जुने आणि वापरात नसल्याने मनोरा आणि विद्युत वाहिनी पूर्णपणे गंजून गेली होती. जुन्या विद्युत वाहिनीच्या खालून मध्य रेल्वेची ठाकुर्ली आणि लोणावळापर्यंत जाणारी अतिउच्च वाहिनी जुन्या झालेल्या उच्चदाब वाहिनीखालून जाते, त्यामुळे मध्य रेल्वेनेही त्यांचा अति संवेदनशील भागाचा विद्युत पुरवठा कामाच्या कालावधीकरिता बंद ठेवण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले होते. आज शुक्रवार सकाळपासूनच मनोरे पाडण्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, कामगार याशिवाय दोन मोठ्या क्रेन सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

गुरुवारी ठरल्यानुसार आज शुक्रवारी २४ नोव्हेम्बर रोजी मध्य रेल्वे आणि महात्मा गांधी यांच्या सहकार्याने महावितरणने विद्युत वाहिनी मनोऱ्यासह पाडण्यात आली. खबरदारीचे उपाय म्हणून कल्याण-बदलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. १२ वाजण्याच्या सुमाराला खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला पूर्ववत करण्यात आला.

वापरात नसलेले विजेचे मनोरे पाडण्यात यावेत या मागणीसाठी गेल्या तीन वर्षांपासून शाळेच्या वतीने पाठपुरावा सुरु होता. महावितरणच्या कारवाईमुळे शाळेच्या पटांगणातील धोका टळला आहे, अशी प्रतिक्रिया महात्मा गांधी विद्यालयांचे संचालक दिलीप कणसे यांनी दिली.