ठामपाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये नाराजी
ठाणे: प्रभाग १४मधील डवले नगर नाक्यावरील पदपथावर असलेला बस स्टॉप महासभेच्या मंजुरीविना भंगारात गेल्याचे चित्र दिसत असून सावरकरनगरमध्ये रस्त्यांच्या मधोमध असलेला चौक तोडायला महासभेची मंजुरी पाहिजे, महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. यावरून नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता दिसत असून प्रशासनाच्या गलथान कारभाराचा नागरिक निषेध करत आहे.
कोणतीही वर्क ऑर्डर नाही, मंजुरी नाही, मग बसथांबा तोडला कसा? भंगार गेले कुठे हा प्रश्न येथील स्थानिक रहिवाशांना पडला आहे. नगरसेवक ठामपाला न विचारता स्वतःच्या अधिकारात निर्णय घेतात असे चित्र दिसत असून रस्त्याच्या मध्ये असलेला चौक रहिवासी स्वतःहून तोडतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
आमचा चांगल्या कामाला विरोध नाही, पण ते काम नियमानुसार व प्रशासनाच्या चौकटीत राहून झाले पाहिजे. रस्त्याच्या मध्ये चौक अडवून वाहतूक कोंडी करणे व फुटपाथवर सुशोभीकरण करून फुटपाथ अडवून ठेवणे अशी कामे पालिकेच्या चौकटीत बसत नाहीत, असे रहिवाशांचे मत आहे. तसेच बसथांबा तोडून भंगार कोणाला विकले गेले याची चौकशी पालिकेने करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.