वाघाला नमवले; बेरोजगारीने हरवले!

शहापूरच्या ‘हाली’ची करुण कहाणी!

शहापूर: तालुक्यातील हाली बरफ या आदिवासी कन्येने लहान वयात आपल्या स्वतःच्या बहिणीचे प्राण वाघाच्या हल्ल्यातून वाचवले. ही घटना संपूर्ण देशभर गाजली होती. ही धाडसी कन्या मात्र अनेक वर्षे बेरोजगार असून व्यवस्थेपुढे हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे.

हालीच्या या पराक्रमाबद्दल तिला देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार बहाल करण्यात आला. तिच्या शौर्याची नोंद आज महाराष्ट्रातील शालेय पाठ्यपुस्तकांत आहे. शहापूर तालुक्यातील व आदिवासी समाजाचा हा अभिमान असून हीच मुलगी सध्या बेरोजगारीच्या गर्तेत सापडली आहे. हाली बरफ मागील काही वर्षांपासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर अंतर्गत खर्डी येथील मुलींच्या वस्तीगृहात रोजंदारीवर काम करत होती. त्याआधी तिने शासकीय आश्रमशाळा पेंढरघोळ व शासकीय मुलींचे वस्तीगृह शहापूर येथेही सेवा बजावली होती. परंतु मागील सहा महिन्यांपासून तिच्या हाताला काम नाही. परिणामी जगण्यासाठी तिला गावागावांत मजुरी करावी लागत आहे. जंगलातील गवत कापून ते विकून जगावे लागत आहे. एकीकडे स्वतःच्या बहिणीचे प्राण वाचवणाऱ्या आणि वाघाशी झुंज देणाऱ्या या धाडसी आदिवासी कन्येला देशभरातून गौरवले जाते. तिच्या शौर्यकथेवरून विद्यार्थी प्रेरणा घेतात, परंतु शासनाने तिला आजवर कायमस्वरूपी नोकरी वा रोजगाराचा आधार दिला नाही, ही बाब समाजाला वेदनादायी व लज्जास्पद ठरली असल्याचे श्रमजीवी संघटनेचे म्हणणे आहे.

श्रमजीवी संघटना शहापूर तालुका यांच्यावतीने या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर प्रभारी प्रकल्पाधिकारी दिवाकर काळपांडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. हाली बरफ हिला तातडीने कायमस्वरूपी नोकरी द्यावी किंवा शासकीय सेवेत समाविष्ट करून तिच्या शौर्याचा सन्मान करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. निवेदन देताना शहापूर तालुका सचिव प्रकाश खोडका आणि तालुका युवा प्रमुख रुपेश अहिरे तसेच स्वतः हाली बरफ उपस्थित होत्या.