ठाणे : कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाबाहेर खासगी रुग्णवाहिका चालकांनी केलेल्या दादागिरीमुळे एका मजुराचा मृतदेह तब्बल तीन तास शवागृहात पडून राहिल्याची बाब समोर आली आहे.
भाडे कमी देण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दुसऱ्या रुग्णवाहिका चालकाला थेट अडवण्यात आले. या प्रकारामुळे माणुसकीचाच जणू मृत्यू झाल्याची चर्चा रुग्णालय परिसरात रंगली होती. विशेष म्हणजे या प्रकारामुळे मृतदेहाची देखील विटंबना झाल्याचे काहींनी म्हटले आहे.
तेलंगणा राज्यातील करिया बिच्चप्पा हा मजूर कल्याणमधील एका इमारतीवरुन पडून मृत्यूमुखी पडला. त्याच्या मृतदेहावर कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मजूर करियाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून त्याला तीन मुली आहेत. वडिलांच्या मुजरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यामुळे, कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं आहे. विशेष म्हणजे, येथील नातेवाईक आणि मित्रांनी पैसे गोळा करुन करियाचा मृतदेह तेलंगणातील गावात घेऊन जाण्याचे ठरवले. त्यासाठी एका खासगी रुग्णवाहिका चालकाशी संपर्क केला असता, त्याने 25 हजार रुपये भाड्याची मागणी केली. त्यावेळी, कुटुंबाने पैसे कमी करण्याची विनंती केली, परंतु त्याने ती मागणी नाकारली. त्याचवेळी दुसरा चालक 15 हजार रुपयांत मृतदेह घेऊन जाण्यास तयार झाला होता. त्यामुळे, करियाच्या नातेवाईकांनी त्याला होकार दिला. पण आधीच्या चालकाने दुसऱ्या चालकाला मज्जाव करत वाद घातला. या दोघांच्या वादात मृतदेह रुग्णालयाबाहेरच पडून राहिला. रुग्णावाहिकेचे भाडे ठरवण्यावरून दोन्ही रुग्णवाहिका चालकांमध्ये तीन तासांहून अधिक काळ वाद सुरू राहिला. त्यामुळे करियाचा मृतदेह इतकाच वेळ शवगृहात पडून होता.