एमआयडीसीच्या विरोधात नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त आक्रमक
नवी मुंबई : एमआयडीसीमार्फत प्रकल्पग्रस्तांना २०२१ साली भूखंडांचे वाटप करण्यात आले होते. यासाठी लागणारी सर्व शासकीय शुल्क भरून देखील एमआयडीसीने भूखंडांवर बांधकाम परवानगी न देता नाहक अडवणूक होत आहे. एमआयडीसीच्या या तुघलकी कारभाराविरोधात प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहेत.
एमआयडीसीने औद्योगिक वसाहत वसवण्यासाठी येथील भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. या संपादित जमिनीच्या मोबदल्यात एमआयडीसी महामंडळाच्या धोरणानुसार भुखंड वितरीत केले जातात. याच धर्तीवर ठाणे-बेलापूर सेवा रस्त्यालगत अशा एकूण २८ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र सदर भुखंड वाटप करून देखील या भूखंडांना एमआयडीसीने बांधकाम परवानगी न दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने देखील बांधकाम परवानगीचे आदेश दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या निर्णयालाही एमआयडीसीने केराची टोपी दाखवत बांधकाम परवानग्या अडवल्या आहेत. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त हवालदिल झाले असून त्यांनी गुरुवारपासून एमआयडीसी कार्यालया बाहेर आमरण उपोषण पुकारले आहे, अशी माहिती नितीन काळे यांनी दिली. याबाबत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.