वसंतविहार, पवारनगर, शिवाई नगर, येऊरवासींकडून अभिनंदनाचा वर्षाव
ठाणे: ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, भाजपचे वसंतविहार, पवारनगर, शिवाई नगर, येऊर प्रभाग क्रमांक ५ ‘ड’ चे उमेदवार सीताराम राणे यांची शासनाच्या राष्ट्रीय सहकार धोरण उच्चस्तरीय समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे या प्रभागासह संपूर्ण ठाणे शहरातील नागरिकांच्या सहकार विषयक समस्यांची तड लागणार असल्याने प्रभागातील समस्त रहिवाशांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
राज्याचे सहकार धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सीताराम राणे यांचा सहकार क्षेत्र तसेच, सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील अनुभव कामी येणार आहे. राज्याच्या सहकार विभागाने केलेल्या या नियुक्तीबद्दल ठाण्यातील गृहनिर्माण संस्थांकडूनही राणेंचे अभिनंदन केले जात आहे.
केंद्र शासनाने राष्ट्रीय सहकार धोरण-२०२५ जाहिर केले आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सहकार धोरणात अनुकूल बदल करण्यासाठी राज्याचे सहकार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये ३१ सदस्यांचा समावेश असून त्यामध्ये ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे पवारनगर, शिवाईनगर, वसंतविहार, येऊर, कोकणीपाडा, रामबाग परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक ५ ‘ड’ चे उमेदवार सीताराम राणे यांचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे सीताराम राणे सहकार क्षेत्रात कार्यरत असून सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विविध अडी-अडचणी सोडविण्यात त्यांचा नियमित पुढाकार असतो. आता शासनाच्या या समितीच्या माध्यमातून सहकार कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या शिफारशी करण्यासाठी सीताराम राणे या समितीच्या माध्यमातून करणार आहेत. त्यामुळे, सहकाराला एक वेगळी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सहकार क्षेत्राला उभारी देण्याचे काम सुरू असून ही समिती त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे, सहकार क्षेत्रात सकारात्मक बदल होऊन सहकारी संस्थांना बळ मिळणार आहे.