अंबरनाथला भाजपची सत्ता हमखास येणार – नाईक

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेत यंदा भाजपची सत्ता हमखास येणार, कोणाची इच्छा असो अथवा नसो अंबरनाथ शहराचा, ठाणे जिल्ह्याचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचा पालकमंत्री, संपर्कप्रमुख या नात्याने आम्ही करणार. एखादा प्रेमाने वागत असेल आणि गाडी भरली असेल तर त्याला अडचण सहन करून गाडीत सोबत घेऊ पण कोणी वरचढ व्हायचा प्रयत्न करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता विरोधकांना दिला.

येत्या 2 डिसेम्बरला अंबरनाथ नगरपालिका थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या स्नुषा तेजश्री करंजुले-पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. या निमित्ताने अंबरनाथ येथे आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मंत्री गणेश नाईक यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात यंदा भाजपचीच सत्ता येणार असा विश्वास देखील मंत्री नाईक यांनी व्यक्त केला. तसेच नवी मुंबईप्रमाणे शहराचा विकास करण्यासाठी अंबरनाथ शहर दत्तक घेत असून सहा महिन्यांत शहरात परिवहन सेवा सुरू करणार अशी घोषणा त्यांनी केली.

भाजपच नव्हे तर आघाडीच्या लोकांवर देखील अन्याय होता कामा नये, कुठे गुंडागर्दी झाली तर चिंता करू नका, पोलिसांमार्फतच अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करू, चिंता करू नका तुमच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा आहे, असा विश्वास त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

शहरात परिवहन सेवा सुरू करू, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यानात विरंगुळा केंद्र उभारू, शहरातील पाण्याची समस्या, वीजपुरवठा, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेऊ असे स्पष्ट केले. अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची स्वतंत्र महानगरपालिका होण्यासाठी प्रयत्न करू, असे नाईक यांनी स्पष्ट केले. बदलापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून आमदार किसन कथोरे यांनी बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका करावी, अशी मागणी केल्याचे वनमंत्री नाईक म्हणाले.