नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आपल्या समर्थकांना तिकीट मिळावे म्हणून मंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे बेलापूरमधील म्हात्रे समर्थकांवर अन्याय झाला तर यातील काही समर्थक शिवसेनेत दाखल होणार आहेत अशी चर्चा आहे. एकूणच भाजपमधील ही अंतर्गत गटबाजी सेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळ वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी काम करुन विजय मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका आमदार मंदा म्हात्रे यांनी मांडली आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे पक्ष सोडून गेले ते आता परत आले असून एकाच घरात अधिक तिकिट मागत आहेत. हे सर्व नाईक समर्थक आहेत. त्यामुळे या उमेदवारांना बेलापूरमधील कार्यकर्ते जोरदार विरोध करत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अद्याप भाजप-सेना युतीबाबत संभ्रम असताना बेलापूरमधील शिलेदारांसाठी आमदार मंदा म्हात्रे खिंड लढवत आहेत. त्यामुळे भाजपामध्ये तिकीट वाटपात मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईत युती झाली नाही आणि तिकीटे वाटपात आमदार मंदा म्हात्रे यांच्या काही समर्थकांना डावलले गेले तर त्यांच्यासाठी शिवसेनेची कवाडे उघडी ठेवली जाणार आहेत, अशी चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे भाजपामधील ही अंतर्गत गटबाजी सेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.