अंबरनाथ: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात परिवर्तन पदयात्रा काढण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेम्बरला होणार होती, मात्र निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने आता ही निवडणूक 20 डिसेम्बर रोजी होणार आहे. या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बुधवार 3 डिसेम्बरला येथील स्वानंद हॉल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक नियोजनाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी काही महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशही जाहीर करण्यात आले. त्यावेळी शहराच्या पूर्व आणि पश्चिमेला परिवर्तन पदयात्रा काढून पक्षला मजबुती मिळवण्यासाठी प्रचार यंत्रणा राबवण्याचे धोरण ठरवण्यात आले. सभेला नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार तेजश्री करंजुले-पाटील यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीने अंबरनाथ शहराला आधुनिक, समृद्ध आणि विकसित शहर बनवण्याचा संकल्प व्यक्त केला असून, हा निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पक्षाला साथ देण्याचे आवाहन पदाधिकारी मेळावा सभेतून नागरिकांना करण्यात आले. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचे नियोजन, तसेच आतापर्यंत झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले-पाटील, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष नंदू परब, जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, बदलापूर शहराध्यक्ष रमेश सोळसे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले-पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.