भाजपा जागांचा उच्चांक गाठणार, काँग्रेसच्या जागा घटणार

ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज

नवी दिल्ली: लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीमध्ये प्रमुख लढत होणार आहे.

लोकसभेची निवडणूक जवळ येत असतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर ठेवलेले ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपा गाठणार का? की इंडिया आघाडी बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ओपिनियन पोलमधून लोकसभा निवडणुकीच्या आगामी निकालांबाबत अंदाज वर्तवले जात आहेत.

अशाच एका ओपिनियन पोलमधून यावेळच्या निवडणुकीत भाजपा त्याच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम करेल. तर काँग्रेसची निचांकी जागांवर घसरण होईल, असा दावा करण्यात आला आहे.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या ओपिनियन पोलनुसार भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३३५ जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तर एनडीएला ३७८ जागा मिळतील असा अंदाजही या ओपिनियन पोलने वर्तवला आहे. तर काँग्रेसला केवळ ३७ जागांवर समाधान मानावे लागू शकते, असा दावाही या ओपिनियन पोलमधून करण्यात आला आहे. असे प्रत्यक्षात घडल्यास काँग्रेससाठी हा जागांचा निचांक ठरणार आहे. विरोधी पक्षांचा इंडिया आघाडीला ९८ जागा मिळू शकतात. तर इतरांच्या खात्यात ६७ जागा जातील, असेही या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रावरही असणार आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाला ४८ पैकी २५, शिवसेना शिंदे गटाला ६ आणि अजित पवार गटाला ४ जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. तर ठाकरे गटाला ८, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला २ आणि काँग्रेसला २ जागांवर समाधान मानावे लागेल, असा दावाही या सर्व्हेमधून करण्यात आला आहे.