ठाण्यात भाजपच्या गटनेतेपदी नवा चेहरा?
ठाणे: निवडणूक काळात सादर केलेल्या निर्धारनाम्यानुसार ठाणेकरांना दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी भाजपला ठाणे महापालिकेत किमान अडीच वर्षांसाठी महत्त्वाची पदे मिळावीत, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली. यावेळी भाजपच्या गटनेतेपदी नवीन चेहरा दिसू शकतो, असे सूतोवाचही त्यांनी केले.
ठाणे वर्तकनगर येथील भाजपच्या मुख्य पक्ष कार्यालयात आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होते.
ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाने ७५ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर भाजपला २८ जागांवर विजय मिळाला आहे. निवडणूक महायुती म्हणून पाठविल्याने मित्र पक्षाने सत्तेत भाजपचा सन्मान राखावा. ठाणेकरांना दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची पदे अडीच वर्षांकरिता भाजपला मिळावीत, अशी मागणी श्री.डावखरे यांनी केली.
प्रभाग समिती, परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपला सामावून घ्यावे, भाजप पक्षामध्ये देखील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार निवडून आले आहेत, त्यांचाही विचार मित्रपक्षाने करावा, असे श्री. डावखरे यांनी सांगितले.
येत्या २७ जानेवारी रोजी भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी देखील प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाची पदे भाजपला मिळावीत याचा पुनरुच्चार केला.
शिवसेना चक्रावली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीसाठी आग्रही आहेत. शिवसेनेला ७५ जागा मिळाल्या असून भाजपला २८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपने केलेली मागणी अवाजवी असून त्यांच्या मागणीने आम्ही चक्रावलो आहोत, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या एका नेत्याने दिली.