ठाण्यात महायुतीमुळे भाजप अस्वस्थ; पक्षवाढीची संधी हुकली!

ठाणे: ठाण्यात पक्षवाढीसाठी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडे चालून आलेली संधी महायुतीच्या निर्णयामुळे हुकली असून भाजप नेते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ठाणे, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक तब्बल तीन वर्षांनी तर कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार महापालिका निवडणूक पाच वर्षांनी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व पक्षीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यात भाजपचे आमदार सर्वाधिक असून पक्षवाढीला वेग आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात दोन गट पडल्याने मतांची विभागणी झाल्याने महापालिका निवडणुका स्वबळावर लढल्यास भाजप महापालिका काबीज करू शकते, असा मतप्रवाह भाजपात वाहत आहे. त्या दृष्टीने ठाणे, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली आदी भागात शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवक आणि स्थानिक नेत्यांना पक्षात घेण्याचा सपाटा भाजपने सुरू केला होता. डोंबिवलीतून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नवी मुंबईतून वनमंत्री गणेश नाईक आणि ठाण्यातून आमदार संजय केळकर यांनी शिंदे गटाविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. एकूणच स्वबळाच्या भूमिकेमुळे भाजपतील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. तसेच पक्षवाढीसाठी ही नामी संधी असल्याचे ओळखून त्या दिशेने भाजपची पावले पडू लागली होती.

भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी दिल्लीत व्यक्त केल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले. दरम्यान नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजपचे सर्व पक्षप्रवेश थांबविण्यात आले. त्यामुळे शिंदे यांची खेळी भाजपला शांत बसविण्यात यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.

गेल्या निवडणुकीत ठाण्यात २३, कल्याण- डोंबिवलीत ४३, मीरा-भाईंदरमध्ये ६१, उल्हासनगरात २१ तर भिवंडीत भाजपचे १९ नगरसेवक निवडून आले होते. नवी मुंबईत भाजपचे केवळ सहा नगरसेवक होते. पण आता चित्र पालटले आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून भाजप प्रवेश केल्यामुळे येथे पक्षाची ताकद वाढली आहे. अशीच ताकद सर्वच महापालिकांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू होता.

ठाण्यात शिवसेना शिंदे गटाकडे सध्याच्या घडीला ८५ माजी नगरसेवकांचे बळ आहे. भाजप येथे ५५ हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याची संधी शोधत होती. पण कळवा, मुंब्य्रात या मनसुब्यांना सुरुंग लावण्यात शिंदे यशस्वी झाले. तसेच महायुतीच्या चर्चेमुळे शिंदे गटातून भाजपात होणारे पक्षप्रवेश रोखले. सध्या नौपाडा, कोपरी, वागळेतील काही प्रभाग, घोडबंदर, उथळसर या परिसरातच भाजपची ताकद दिसते. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात समान हक्क मागण्याची इच्छा असूनही १३१ पैकी ४० ते ४५ जागाच भाजपच्या वाट्याला येण्याची चिन्हे दिसत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत भाजपचे ४३ नगरसेवक निवडून आले होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या खेळीने ऑपरेश लोटसअंतर्गत ही संख्या वाढण्याचा प्रयत्न झाला. पण आजच्या घडीला शिवसेना शिंदे गटाकडे ६० पेक्षा जास्त माजी नगरसेवक आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ही संख्या आणखी वाढणार आहे. अशावेळी ५० टक्के जागेवर भाजपने केलेला दावा कितपत टिकतो हे पहावे लागणार आहे.

नवी मुंबईत स्वतंत्र लढण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक ठाम आहेत. पण येथेही शिवसेना शिंदे गटाचे ४५ पेक्षा जास्त माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे महायुती झाली तर शिंदे यांना झुकते माप येथे द्यावे लागणार आहे. मीरा- भाईंदर मध्येही महायुती शिवसेना शिंदे गटाच्या पथ्यावर पडणार असल्याचे बोलले जात आहे.