ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेमध्ये चढाओढ

ठाणे : एकीकडे ठाणे लोकसभा मतदार संघावर शिवसेना शिंदे गट दावा करत असताना दुसरीकडे मात्र भारतीय जनता पक्षाने या मतदार संघातील मतदारांकडून जाहीरनामा तयार करण्यासाठी मते मागवली आहेत. यासाठी वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या मतदार संघावर ताबा मिळविण्यावरून सेना भाजपात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघातील मतदारांचे मत विचारात घेऊन भाजपा त्यांचा जाहीरनामा तयार करणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबपोर्टलचे शहर भाजपा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक आ निरंजन डावखरे, संदिप लेले, मनोहर डुंबरे, मनोहर सुखदरे आदी उपस्थित होते.

नवी मुंबई, मीरा भाईंदर, आणि ठाणे ही मुंबईची उपनगरे राहिली नाही त्यांची स्वतःची ओळख आहे मुंबईची झळाळी या तीन शहरांवर अवलंबून आहे. एमएमआरडीएने देखिल या शहराच्या विकासावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत, आणखी काय करणे गरजेचे आहे याबाबतची त्यांची मते घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येणार असल्याचे श्री.सहसत्रबुदे यांनी सांगितले.

www.thaneloksabha.in या वेबसाईट वर मत मांडावे, असे त्यांनी सांगितले. शिवसेना देखिल या मतदार संघावर दावा करत आहे. तुम्ही देखिल याच मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे असा प्रश्न विचारला असता सहस्रबुद्धे म्हणाले कि आम्ही राज्यातील ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार उभे करणार आहोत. ४५ जागांवर विजय मिळविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने आम्ही जमिनीवर काम करत आहोत. शिवसेना काय करते ते आम्ही सांगू शकत नाही, परंतु आम्हाला महायुतीचे उमेदवार विजयी करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करायचे आहे असे सांगितले.

शिवसेना शिंदे गटाने देखिल मागील महिन्यात ठाणे लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी यांना बूथ लेव्हलला काम करण्याच्या सूचना केल्या होत्या. या मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची माहिती देण्याच्या सूचना केल्या होत्या त्यामुळे महायुतिमधील या दोन्ही पक्षात मतदारसंघ काबीज करण्यासाठी संघर्ष होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे