अंबरनाथ नगराध्यक्षपदासाठी भाजप निवडणुकीच्या रिंगणात

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने अखेर नगराध्यक्षपदासाठी दावा केला आहे. या पदासाठी तेजश्री करंजुले-पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ पूर्व येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी सायंकाळी भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले-पाटील व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजपाच्या उच्चशिक्षित, चार्टर्ड अकाउंटंट तेजश्री करंजुले-पाटील यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून पक्षश्रेष्ठींकडे मागणी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेने सर्वात प्रथम नगराध्यक्ष पदासाठी दावा केल्यानंतर आता मित्र पक्ष भाजपने अंबरनाथ नगराध्यक्ष पदासाठी दावा केला आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवार तेजश्री करंजुले-पाटील यांनी नुकतीच महिलांची बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा करून मंगळवारी सकाळी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीस सुरुवात केली आहे.

भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य तथा जनतेमधून थेट निवडून आलेले अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या स्नुषा तेजश्री करंजुले-पाटील यांच्या नावाची भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर सुरू झाली आहे. तेजश्री करंजुले-पाटील या उच्चशिक्षित चार्टर्ड अकाउंटंट असून ग्रामपंचायत पातळीवर माहेरी तसेच शहरात सासर घरी कौटुंबिक राजकीय वारसा त्यांना प्राप्त झाला आहे. भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी न्याय मिळाल्यास निश्चितच पूर्णत्वास नेणार असा विश्वास भाजपाकडून नगराध्यक्ष पदाच्या दावेदार तेजश्री यांनी व्यक्त केला.