मुंबई महापालिकेवर भाजप महायुतीचा झेंडा!

मुंबई: अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ८९ जागांवर विजय मिळवला तर मित्रपक्ष शिवसेनेने (शिंदे गट) २९ जागांवर विजय मिळवला. महायुतीने बहुमताचा आकडा पार केल्याने ठाकरे कुटुंबाच्या हातून मुंबई महापालिकेची सत्ता निसटली आहे.

भाजपचा वारू रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनोमिलन होऊन राज्यात युती करून निवडणुका लढविल्या. ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला होता. विशेषतः त्यांनी घेतलेल्या मराठी भाषा आणि मराठी माणूस धोरणाचा फायदा मुंबई महापालिका निवडणुकीत होईल असा विश्वास शिवसैनिकांमध्ये होता. परंतु ठाकरे गटाने बऱ्यापैकी यश मिळवले असले तरी मनसेला मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नगरसेवक निवडून आणता आले.

मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच डावपेच आखण्यास सुरुवात केली होती. भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाने मात्र अलिप्त राहण्याचे ठरविले. दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसे यांच्या आघाडीतून काँग्रेसने देखील फारकत घेतली. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशीच झाली.

शुक्रवारी मतमोजणीवेळी अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका बसला तर काही नेत्यांच्या मुलांना देखील मतदारांनी स्वीकारले नाही. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवला तर शिवसेना शिंदे गटाने २९ जागांवर विजय मिळवला. ठाकरे गटाने ६५ जागांवर विजय मिळवत दुसरे स्थान पटकावले. मात्र मनसेने अवघ्या सहा जागांवर विजय मिळवत निराशा केली. काँग्रेसने मात्र २४ जागांवर विजय मिळवत झेप घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाने तीन, शरद पवार गटाने एक जागा पटकावली. तर १० अपक्ष निवडून आले.

महायुती ११८ जागा मिळाल्या असून ठाकरे गट मनसेला ७२ जागा मिळाल्या आहेत. महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असला तरी ठाकरे बंधू सक्षम विरोधी गट म्हणून महापालिकेत भूमिका बाजू शकेल, असा दावा ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांमधून करण्यात येत आहे.