नगरसेवक मनोहर डुंबरे यांचा आरोप, चौकशीची मागणी
ठाणे: महापालिका क्षेत्रातील मल उदंचन व प्रक्रिया केंद्राचे कंत्राट मिळालेल्या एका कंपनीच्या नावाने त्याच नावाची बनावट कंपनी स्थापन करून महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचे बिल वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, या प्रकरणी कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, फसवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला पुन्हा सहा मल उदंचन केंद्राचे काम देण्याची कार्यवाही सुरू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे महापालिकेने मल उदंचन केंद्र व कोविड रुग्णालयाच्या मल प्रक्रिया केंद्राचे परिचलन, निगा, देखभाल आणि दुरुस्तीचे कंत्राट २०२० मध्ये मे. ए. के. इलेक्ट्रीकल अँड वर्क्स यांना दिले होते. या कंपनीचाच अनुभव वापरून निविदा मिळविण्यात आली. या कंपनीच्या विजया बॅंकेतील खात्यावर महापालिकेकडून सुरुवातीला बिले देण्यात आली होती, असे मनोहर डुंबरे यांनी पत्रात म्हटले आहे.
काही महिन्यानंतर उपनगर अभियंता (यांत्रिकी) यांच्या मर्जीने कंत्राटदाराने मे. ए. के. इलेक्ट्रीकल अँड वर्क्स या कंपनीच्या नावाचीच दुसरी कंपनी तयार करून, स्वत: ती बिले बोगस कंपनीच्या नावाने निविदा कालावधी पूर्ण होईपर्यंत घेतली. त्यांचे बॅंकेतील खातेही वेगळे होते. संबंधित प्रकार हा ३ नोव्हेंबर २०२१ रोजी उघड झाल्यानंतरही, आजतागायत कंत्राटदाराला फौजदारी कारवाई किंवा महापालिकेकडून काळ्या यादीत टाकण्याची कारवाई झालेली नाही. या प्रकाराला महापालिकेच्या यांत्रिकी विभागातील उप नगर अभियंता यांचा आशीर्वाद आहे, असा आरोप मनोहर डुंबरे यांनी केला. महापालिकेची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारालाच पुन्हा सहा ठिकाणच्या मल उदंचन केंद्राचे काम १० वर्षांसाठी ३८ कोटी रुपयांना देण्याचा घाट घातला जात आहे, याकडे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले.
मल जलाऐवजी चक्क सोलारमधून वीजनिर्मिती
कोपरी येथील मल उदंचन केंद्रात मल जलापासून वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने १० कोटी रुपये दिले. मात्र, तेथे चक्क सोलार सिस्टीमचा वापर करून वीजनिर्मिती केली गेली, याकडे मनोहर डुंबरे यांनी लक्ष वेधले आहे. या प्रकल्पातून महापालिकेला १० टक्के रॉयल्टी कधीही मिळालेली नाही, असे मनोहर डुंबरे यांनी सांगितले.