उल्हासनगर येथील महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली विकासकामांची पाहणी

उल्हासनगर: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शहरात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत. तसेच नव्याने आखणी करण्यात आलेल्या प्रकल्पांचे मंगळवारी त्यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. काही प्रकल्पांचे लोकार्पण करत नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आले. यावेळी शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी देखील केली.

उल्हासनगर शहराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने एक हजार कोटींहून अधिक निधी देण्यात आला आहे. मंगळवारी भूमिपूजन करण्यात आलेली सर्व विकास प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

उल्हासनगर शहरात बहुतांश रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. उर्वरित रस्त्यांचे काम सुरु आहे. यामध्ये १५१ कोटी रुपयांच्या निधीतून आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यांच्या कामानंतर शहरातील वाहतूकदारांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यातील नेताजी ते निजधाम रस्त्याची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी दिल्या. याच बरोबर यावेळी त्यांनी उल्हासनगर – १ रिजन्सी अँटालिया येथील रुग्णालयाची, ईएसआयएस रुग्णालयाची तसेच अजमेरा गृह प्रकल्प येथील ई- बस चार्जिंग स्टेशनची पाहणी केली.

उल्हासनगर महापालिकेच्या वतीने उल्हासनगर-१ येथील रिजन्सी अँटालिया येथे विविध अत्याधुनिक सोयी सुविधानी युक्त असे हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. यामध्ये १९० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये ५० आयसीयू खाटांचा समावेश असून याठिकाणी एक्सरे, सिटी स्कॅन, २ डी इको, सोनोग्राफी, अशा चाचण्यांसह डोळे, कान-नाक-घसा, डोळे, अस्थिव्यंग, हृदयरोग यावरही उपचार केले जाणार आहेत. तसेच प्रसूती शस्त्रक्रियेसोबतच हृदय, मेंदू, पोट आणि कॅन्सरच्या शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. यासाठी कॅथलॅबसह ५ सुसज्ज ऑपरेशन थिएटरदेखील याठिकाणी असणार आहेत. विशेष म्हणजे शासकीय आरोग्य योजनांसाठी पात्र रुग्णांना येथे मोफत उपचार मिळणार असून अन्य रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळणार आहेत.

याच पद्धतीने उल्हासनगर शहरात मध्यवर्ती कामगार रुग्णालयाची १०२ कोटी रुपयांच्या निधीतून उभारणी करण्यात येत आहे. या रुग्णालयात कामगारांना सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहेत.

या प्रकल्पांचे भूमिपूजन

* उल्हासनगर पाच येथील शहरातील दुर्गापाडा परिसरात दहा दशलक्ष लिटर क्षमतेच्या उंच साठवण टाकीची बांधकाम करण्यात येत आहे.
* सुभाष टेकडी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि पुतळ्याच्या आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण
* उल्हासनगर आणि चांदीबाई महाविद्यालय परिसराला जोडणाऱ्या पुलाची ४.०२ कोटी रुपयांच्या निधीतून उभारणी
* उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक १७, १८ आणि २४ या शाळांच्या इमारतींचे भूमिपूजन तसेच शाळा क्रमांक १७ येथे अभ्यासिका

या कामांचे लोकार्पण
* उल्हासनगर – ३ येथील मध्यवर्ती पोलीस स्थानकासमोरील अग्निशमन केंद्र
* शांतीनगर येथील स्मशानभूमीत डिझेलवरील आणि कैलाश नगर येथील स्मशानभूमीत सीएनजीवरील शवदाहिनी तसेच खडेगोळेवली येथील स्मशानभूमीत श्वानांसाठी स्वतंत्र शवदाहिनी