भिवंडी: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षाने १२ जागा जिंकल्या असून त्यांच्या मताने यावेळी भिवंडी मनपाचा महापौर बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिवसेना-भाजप असो वा काँग्रेस ते कोणाला आपल्या सोबत घेतात कि अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देतात?, त्यानुसार महापालिकेत महापौर होणार हे निश्चित आहे. मात्र महापौर पदाच्या आरक्षणानंतर या हालचालींना वेग येणार असल्याचे वृत्त आहे.
भिवंडीकरांनी केलेल्या मतदानाने कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळालेले नाही. तर माजी महापौरांनी स्थानिक पातळीवर आपलीच उमेदवारी कायम ठेऊन भविष्यात देखील प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सुरु केली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला सत्ता स्थापन करणे कठीण झाले आहे. माजी महापौर विलास पाटील व माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या कोणार्क विकास आघाडीचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. तर माजी महापौर जावेद दळवी यांच्या भिवंडी विकास आघाडीचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. यापूर्वी अशा कमी जागा हाती असताना देखील कोणार्क विकास आघाडीने निवडून आलेले राजकीय पक्षाचे नगरसेवक आपल्या दावणीला बांधून आपला महापौर बसविला होता. त्यातच १२ राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे नगरसेवक निवडून आल्याने महापौर पदाच्या निवडणुकीत यांची मते निर्णायक राहणार आहेत. दरम्यान, भाजप-शिवसेना महायुतीने महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३४ जागा जिंकल्या आहेत. भिवंडी महानगरपालिकेत एकूण ९० नगरसेवक निवडून आल्याने महापौरपदासाठी ४६ नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे आवश्यक असलेल्या १२ मतांसाठी सत्ताधारी कोणाकोणाचा पाठिंबा घेणार याकडे भिवंडीकरांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे व माजी नगरसेवक सुमित पाटील आणि नारायण चौधरी हे महापौरपदाचे प्रबळ दावेदार आहेत. या दोन्ही उमेदवारांचे त्यांच्या पक्षातीलच नव्हे तर बहुतेक नगरसेवकांशी चांगले संबंध आहेत. जर पक्षाने निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद) च्या १२ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला तर भाजपचा देखील महापौर होऊ शकतो. मात्र भाजप कोणते पाऊल उचलते यावर भाजपच्या उमेदवाराचे भविष्य अवलंबून आहे. यापूर्वी चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीने यापूर्वी फक्त सहा नगरसेवकांसह महापौर निवडून आणला आहे. गेल्या निवडणुकीत, काँग्रेसने ४७ जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले असूनही, कोणार्क विकास आघाडीकडे १८ काँग्रेस नगरसेवकांनी पक्षाविरुद्ध बंड करून कोणार्कला पाठिंबा दिला होता. हा चमत्कार केवळ भिवंडीत घडू शकतो.
पक्षीय बलाबल: भाजप-२२, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-३०, शिवसेना (शिंदे )१२, राष्ट्रवादी काँग्रेस (शप )-१२, समाजवादी पक्ष-६, कोणार्क विकास आघाडी-४,भिवंडी विकास आघाडी-३, अपक्ष-१