नगरसेवक गायब झाल्याने मतदारांचा अपेक्षाभंग
भिवंडी: गेल्या चार वर्षांत सुरु असलेल्या प्रशासकीय कारभाराने शहरातील नागरिक त्रस्त झाले असून त्यांच्या छोट्या-मोठ्या तक्रारींकडे पालिका अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सपशेल दुर्लक्ष केले आहे. तर निवडणूक झाल्यानंतरही महापौर निवडणूक रखडली तसेच नगरसेवकही अज्ञातस्थळी रवाना झाल्याने नागरी सेवेवर परिणाम झाला आहे.
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीला होऊन १६ जानेवारीला निकाल लागला. या घटनेस २३ दिवस उलटून देखील महापौर पदाची निवडणूक झालेली नाही. या निवडणूक निमित्ताने काही इच्छुक उमेदवारांनी नगरसेवकांच्या सहली आयोजित केल्याने ते आपापल्या वार्डातून व प्रभागातून गायब झाले आहेत. त्यामुळे लोकवस्तीमधील मतदारांची अनेक कामे रखडलेली आहेत.
शहरातील खड्डे दुरुस्त करून देखील पुन्हा ते खड्डे पूर्व स्थितीत झाले आहेत. तर सिमेंटच्या रस्त्यांवर देखील काही ठिकाणी असलेले खड्डे तसेच सिमेंट रस्ते पूर्ण झाल्यानंतर मूळ रस्त्याला न जोडल्याने राहिलेल्या उंचवट्याचा सामना नागरिकांना व वाहनधारकांना करावा लागत आहे. अशा उंचवट्याच्या अडथळ्याने त्या ठिकाणी नागरिक व दुचाकी वाहनचालक रस्त्यावर पडून जखमी होत आहेत. याबाबत पोलीस कर्मचारी पालिकेच्या विरोधात तक्रार घेत नसल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांचे फावले आहे. तर नागरिकांनी तक्रार करूनही त्याकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत रस्ते ठेकेदारावर कारवाई करीत नाही. त्याचप्रमाणे कचरा ठेकेदार देखील कचरा वेळेवर उचलत नसल्याने अनेक ठिकाणी कचरा साठलेला दिसून येत आहे. अशीच स्थिती पालिकेच्या विविध विभागांची असून नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने सध्या सुरु असलेल्या प्रशासकीय कारभाराला शहरातील नागरिक त्रासलेले आहेत.
शहरात गेल्या काही वर्षांपासून धोरणात्मक निर्णय न झाल्याने विविध कामे रखडलेली असून प्रशासकीय कारभाराने नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वास्तविक आता निवडणूक झाल्याने पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर महापालिकेच्या नियमानुसार धोरणात्मक निर्णय घेता येतील. मात्र त्यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, स्वीकृत सदस्य यांच्यासह विविध समित्याची निवड होणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या २३ दिवसांपासून महापौर पदाचीच निवडणूक रखडल्याने शहरवासी हवालदिल झाले आहेत. त्यातच जे काही नगरसेवक नव्याने निवडून आले आहेत आणि ते भिवंडीत आहेत त्यांनी मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्या वार्डात नागरी कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या वार्डात स्वच्छता करून जंतुनाशक पावडर व जंतुनाशके औषधांची फवारणी सुरु केली आहे. मात्र जे नगरसेवक शहराबाहेर आहेत, त्यांच्या वार्डातील नागरिक बेहाल झाले असून ते नगरसेवकांच्या कार्यालयात आणि त्यांच्या घरी खेटे घालत आहेत. अशा मतदारांचा मात्र अपेक्षाभंग होत असल्याचे ते खाजगीत बोलत आहेत.
भिवंडी महापालिकेच्या महापौर निवडणुकीस कोकण आयुक्तांकडून विलंब होत असल्याचा आरोप मतदारांकडून केला जात आहे. याबाबत कोकण आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही. भिवंडी महानगरपालिकेची महापौरांची निवडणूक झाल्यानंतर इतर पदाधिकारी पालिकेचा कारभार हाती घेत नाहीत तोपर्यंत शहरासाठी धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. मात्र आमच्यापर्यंत नागरिकांची येणारी कामे निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती मुख्यालय उपायुक्त विक्रम दराडे यांनी दिली.