गॅस गळतीमुळे भेळपुरीच्या दुकानाला आग; दोघे जखमी

राबोडी भागातील घटना

ठाणे: रस्त्यावर वडापाव, चायनीज खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या निष्काळजीपणामुळे दुर्लक्ष होत असतानाच आज राबोडी येथील आकाशगंगा परिसरात एका भेळपुरीच्या दुकानात गॅस सिलेंडरची गळती होऊन लागलेल्या आगीत दोन जण भाजल्याची घटना घडली आहे.

आकाश गंगा कॉम्प्लेक्स येथे चित्रा विशाखा ही सात मजली इमारत असून तळ मजल्यावर साईनाथ भेळपुरी सेंटर आहे. राजपत यादव हा या गाळ्यात भाडेतत्त्वावर व्यवसाय करत आहे. या दुकानामध्ये एच.पी. कंपनीचा गॅस सिलेंडरची गळती होऊन आग लागली होती.

या घटनेत आग लागून दुकानातील इलेक्ट्रिक वस्तूंचे आणि खाद्यपदार्थांचे जळून नुकसान झाले आहे. तर राजपत यादव आणि रतनदेवी यादव (४५) हे भाजले असून त्यांना उपचाराकरिता लाईफलाईन हॉस्पिटल, खोपट याठिकाणी दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान दोन फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहनासह दाखल झाले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांकडून आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून आग पूर्णपणे विझविण्यात आली.