टीजेएसबी सहकारी बँकेत भवानी सहकारी बँक विलीन

ठाणे: टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडमध्ये भवानी सहकारी बँक लिमिटेडच्या विलीनीकरणाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० एप्रिल रोजी या विलीनीकरणाला अधिकृत मंजुरी दिली असून, सोमवार, ४ मे २०२६ पासून हे विलीनीकरण पूर्ण झाले आहे.

रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ४४अ आणि कलम ५६ नुसार ही मान्यता दिली. या धोरणात्मक निर्णयामुळे टीजेएसबी बँकेचा मोठ्या प्रमाणात विस्तार मुंबई शहरात झाला आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टीजेएसबी सहकारी बँकेने २५,३६० कोटींचा एकूण व्यवसाय केला आहे. यात १६,२४४ कोटींच्या ठेवी आणि ९,११६ कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. या विलीनीकरणानंतर बँकेचे जाळे सात राज्यांत एकूण १७१ शाखांचे जाळे निर्माण झाले आहे.

या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष शरद गांगल म्हणाले, भवानी सहकारी बँकेचे विलीनीकरण हे केवळ विस्तारीकरण नसून, सहकारी बँकिंग क्षेत्रात आमचे स्थान अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने उचललेले एक दमदार आणि धोरणात्मक पाऊल आहे. या विलीनीकरण प्रक्रियेतून आम्ही अधिक मोठ्या संख्येच्या ग्राहक वर्गाला दर्जेदार बँकिंग सेवा देऊ.

बँकेचे उपाध्यक्ष सीए वैभव सिंगवी म्हणाले, या विलीनीकरणामुळे भवानी सहकारी बँकेच्या ग्राहकांना आधुनिक डिजिटल बँकिंग सुविधा आणि विश्वासार्ह सेवेचा लाभ मिळेल. यामुळे त्या ग्राहकांचा बँकिंग अनुभव अधिक सुरक्षित, गतिमान आणि सुलभ होईल.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर म्हणाले, आमचे लक्ष नेहमीच ग्राहक-केंद्रित सेवा आणि शाश्वत वाढीवर राहिले आहे. भवानी बँकेच्या समावेशामुळे आमचे मुंबई शहरात शाखांचे जाळे अधिक मजबूत होईल. ग्राहकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार बँकिंग सेवा नियमितपणे देता येईल.

१९७२ मध्ये स्थापन झालेली टीजेएसबी बँक ही महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड अशा सात राज्यांत कार्यरत असलेली अग्रगण्य सहकारी बँक आहे. बँक ग्राहक केंद्रित दृष्टीकोन, गतिमान वित्त सेवा, आधुनिक तंत्रज्ञान आधारित सुविधा यासाठी ओळखली जाते.