भाईंदर/भिवंडी: वाहतूक नियमन करताना वसईत ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहन चालकाने दगडाने वाहतूक पोलिसाचे डोके फोडले तर भिवंडीत रस्त्यात सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली. दोन्ही प्रकरणात आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
होळी व धुळवडीच्या निमित्ताने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वसई शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ३ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास वसई पूर्व येथील रेंज नाका, टॉप टेन मोबाईल शॉपजवळ वाहतूक पोलीस जसवंत वळवी आणि पोलीस नाईक विनोद माने यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू होती. याच दरम्यान अभिषेक जैसवार (२१) हा दुचाकीवरून (एमएच ४८-डीएन-४५११) ट्रिपल सीट जात होता. याच दरम्यान पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू केली होती. या कारवाईवरून अभिषेक याने पोलिसांच्या सोबत वाद घातला. वाद इतका विकोपाला गेला की अभिषेकने रागाच्या भरात रस्त्यावर पडलेला दगड उचलून वाहतुक पोलीस जसवंत वळवी यांच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरात मारला. यात पोलीस कर्मचारी जमिनीवर कोसळल्यानंतरही आरोपी थांबला नाही; त्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने त्यांच्या डोक्यावर अनेक वार करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. वाहतूक पोलिसांवर कारवाई दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलीसाने दिलेल्या तक्रारीवरून वालीव पोलीस ठाण्यात पोलिसांनी आरोपी अभिषेक जैसवारविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
दुसऱ्या घटनेत वाहतूक पोलीस हवालदार रमेश पाटोळे (५४) ही होळीनिमित्त भिवंडी शहरात बंदोबस्तावर असताना दोन तरुण रस्त्यात एकमेकांसोबत वाद घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाटोळे हे वाद सोडविण्यासाठी गेले असता, त्यापैकी एकाने पाटोळे यांचा गळा दाबला. तसेच त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली.
पाटोळे यांना मारहाण होत असल्याने परिसरातील नागरिक त्यांना वाचविण्यासाठी आले. त्यांच्यासोबत देखील त्या व्यक्तीने वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाटोळे यांनी एका रिक्षामध्ये बसवून त्या व्यक्तीला भिवंडी शहर पोलीस ठाण्यात आणले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव इम्रान इद्रिस सिद्दीकी असून तो अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्याच्याविरोधात पाटोळे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.