बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची तहान भागवणारे बारवी धरण आज मंगळवारी दुपारच्या सुमारास ओसंडून वाहू लागले.
यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली होती, मात्र गेल्या दोन-तीन आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने आज अखेर बारवी धरण भरून वाहू लागले.
यामुळे ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. बारवी धरणाची क्षमता ३३८.८४ दशलक्ष घनमीटर इतकी असून मंगळवारी धरणाने आपली ७२.६० मीटर पाणी पातळी गाठली, त्यामुळे धरण ओसंडून वाहू लागले. अवघ्या ३५ दिवसात बारवी धरण २५ टक्क्यांवरून १०० टक्क्यांवर आल्याने पाणीकपातीचे संकट असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.