वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या घोडबंदर, शिळफाटा, काटई, बदलापूर रस्ते महामार्गावरील माल वाहतूक करणारी अवजड वाहतूक सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत अशी १८ तास बंद करण्याचा आदेश वाहतूक विभागाने काढल्याने माल वाहतूकदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
१८ तासानंतर शहराच्या वेशीवरील ही वाहने जेव्हा मुख्य रस्त्यावर येतील त्यावेळी वाहतूक कोंडी होणार नाही का? १८ तासांत शहरांच्या मुख्य प्रवेशद्वारांवर अवजड वाहनांच्या रांगा लागून त्या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण असेल, असे प्रश्न माल वाहतूकदारांनी उपस्थित केले आहेत.
माल वाहतूक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागातील वाहने विविध भागातील तयार, कच्चा माल घेऊन दररोज धावत असतात. पक्का, कच्चा माल वेळेत पोहचणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत ही वाहने अठरा तास ठाणे, मुंबई, कल्याण, शहापूर, मुरबाड, बदलापूर, कर्जत शहरांच्या वेशीवर वाहतूक विभागाने थोपवून धरली तर मोठे पेचप्रसंग निर्माण होणार आहेत.
मुंबईच्या वेशीवरील ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, अंबरनाथ, डोंबिवली, भिवंडी, सरवली, रायगड जिल्ह्यातील तळोजा या महत्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत. शेकडो वाहने दररोज या औद्योगिक वसाहतींमध्ये कच्चा, पक्का माल घेऊन धावत असतात. उत्पादन प्रक्रियेसाठी माल वेळेत पोहचणे आवश्यक असते. माल वेळेत आला नाहीतर उत्पादक उद्योजकांचे कोट्यवधीचे नुकसान होते. धान्यसदृश्य माल वेळेत पोहचणे आवश्यक असते. मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यात हा माल भिजला तर त्याचे खापर विक्रीदार, खरेदीदार वाहतूकदारावर फोडतात. तो भुर्दंड अनेक वेळा वाहतूकदाराला बसतो. हे सर्व प्रश्न या अवजड वाहन बंदीच्या माध्यमातून निर्माण होणार आहेत, असे माल वाहतूकदारांनी सांगितले.