डम्पिंगच्या जाचातून होणार बदलापूर उल्हासनगर, अंबरनाथकरांची सुटका

संयुक्त घनकचरा प्रकल्प वर्षभरात

अंबरनाथ: अंबरनाथसह उल्हासनगर आणि बदलापूर शहरातील संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या सीमेवरील वालिवली परिसरात स्पेनच्या धर्तीवर आधारित असा बंदिस्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचे काम जोमाने सुरु आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून १४८.६८ कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या कामाची माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी आज मंगळवारी पाहणी करून आढावा घेतला.

शहरातून गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यावर या ठिकाणी प्रक्रिया होणार असून नागरिकांची डम्पिंगच्या त्रासातून लवकरच मुक्तता होईल. त्यामुळे हा प्रकल्प शहरवासीयांसाठी महत्वपूर्ण ठरणार असून नागरिकांना होणारा त्रास दूर होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष वाळेकर यांनी सांगितले. २३ पैकी १३ एकर जागेवर उभारण्यात येणार हा प्रकल्प येत्या वर्षभरात सुरु होऊन शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अंबरनाथ-बदलापूर शहराच्या सीमेवर असलेल्या वालीवली परिसरातील हा प्रकल्प राज्यातील पहिला संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात प्रतिदिन ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्य होणार असून डम्पिंग ग्राऊंडची दुर्गंधी, धूर, वारंवार आग धुमसण्याच्या त्रासातून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका होणार आहे. शिवाय अंबरनाथसह बदलापूर आणि उल्हासनगरातील कचऱ्याचा प्रश्न देखील मार्गी लागेल. सुरुवातीला अंबरनाथ आणि बदलापूरच्या कचऱ्यावर प्रामुख्याने प्रक्रिया करण्यात येणार असून गरजेनुसार उल्हासनगरचा १०० ते २०० टन कचरा स्वीकारला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील कचरा प्रश्नाला दिशा देणारा हा प्रकल्प ठरेल असा विश्वास व्यक्त होत आहे.

डिसेंबर २०२४ पर्यंत हा प्रकल्प सुरु होणे अपेक्षित होते. जानेवारी २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होणार असल्याचे चित्र दिसत आहे. यावेळी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शैलेश भोईर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.