बदलापूर मनसेच्या शहर महिलाध्यक्षा राष्ट्रवादीत

बदलापूर: मनसेच्या बदलापूर शहर महिलाध्यक्ष संगीता चेंदवणकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मनसेचा आक्रमक चेहरा अशी गेल्या अनेक वर्षांपासून ओळख असलेल्या चेंदवणकर यांचा राष्ट्रवादीत झालेला हा प्रवेश म्हणजे मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. संगीता चेंदवणकर यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी राष्ट्रवादीचे बदलापूर शहराध्यक्ष प्रभाकर पाटील, नगरसेविका प्रियांका दामले, सुगंधा पाटील तसेच राम लिये, राजेश पाटील आदी उपस्थित होते.

आशिष दामले यांनी संगीता चेंदवणकर यांचे राष्ट्रवादीत स्वागत करून त्यांना यथोचित स्थान मिळेल अशी ग्वाही दिली. नागरिकांच्या कोणत्याही समस्याची सोडवणूक करण्यात चेंदवणकर कायम आघाडीवर होत्या. चेंदवणकर यांनी विधानसभेची तसेच थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे बदलापुरात राष्ट्रवादी आणखी बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वासही कॅप्टन दामले यांनी व्यक्त केला.

कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्ष संघटनेतून कार्य करून संघटना वाढीला महत्व देणार असल्याचे संगिता चेंदवणकर यांनी सांगितले.