बदलापूर : येत्या महाराष्ट्र दिनी बदलापूरशहर आणि परिसर भारनियमनच्या जोखडातून मुक्त होईल आणि नियमित वीज पुरवठा सुरू होणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.
वाढता उन्हाळा, त्या तुलनेत वाढती वीजेची मागणी आणि मिळणारा वीज पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाली होती, त्यामुळे शहरात ऐन उन्हाळ्यात चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्याची वेळ विद्युत खात्यावर आली होती, मात्र विद्युत पुरवठा सुरळीत रहावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. बदलापूरप्रमाणे अंबरनाथचाही विद्युत पुरवठा अखंड सुरू राहील असे आमदार कथोरे म्हणाले.
जांभूळ येथील विद्युत केंद्रात इचव्ही नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम महावितरणने सुरू केले आहे. 50 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर येत्या आठ दिवसांत कार्यान्वित होणार आहे, त्यामुळे मोरीवली येथून बदलापूरच्या पूर्व आणि पश्चिमेला होणारा वीजपुरवठा जांभूळ येथील अति उच्च दाब वाहिनीद्वारे होणार आहे, यामुळे मोरीवली येथील उपकेंद्रामध्ये होणारा विजेच्या अतिभाराचा लोड कमी होऊन वीज पुरवठा सुरळीत होणार आहे, असेही आमदार कथोरे यांनी स्पष्ट केले.
वाढत्या तापमानामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले. अशात वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले. परिस्थिती गंभीर झाली असतानाही बदलापूरवासींनी दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा आहे. त्यांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र आता भारनियमनमुक्त बदलापूर होणार असल्याने नागरिकांनी साथ द्यावी, असे आवाहनही आमदार कथोरे यांनी केले. भाजपा शहराध्यक्ष शरद तेली, संभाजी शिंदे, उत्तम विशे, मिलिंद धारवडकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महापारेषणच्या २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून ३० एप्रिलपर्यंत ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होणार आहे. परिणामी महापारेषणच्या १००/२२ मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन महावितरणच्या बदलापूर, अंबरनाथ, कानसई आणि कात्रपमधील ग्राहकांच्या अखंडित वीजपुरवठ्याला मदत मिळणार आहे.
जांभूळ उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे दोन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत. यातील पहिला ट्रान्सफॉर्मर १९ एप्रिलला छत्रपती संभाजीनगरहून रवाना होईल आणि ३० एप्रिलपर्यंत तो कार्यान्वित करण्यात येईल. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चारपैकी दोन उच्चदाब वीजवाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून या वाहिन्या त्याचवेळी कार्यान्वित करण्यात येतील. त्यामुळे मोरीवली उपकेंद्रावरील भार कमी होऊन ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्यात मोठी मदत मिळणार आहे. सध्या या भागाला मोरीवली १००/२२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. वाढते तापमान आणि रात्रीच्या वेळी विजेची वाढलेली मागणी यामुळे महापारेषणकडून लोड रिलिफ मागीतला जात आहे.
जांभूळ उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित होण्यापूर्वी स्थानिक स्तरावर उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात आवश्यकतेनुसार गोवेली स्विचिंगच्या गोवेली फिडरवर मोहन सबर्बिया फिडरचा भार, १७ नंबर स्विचिंगवर कानसाई फिडरचा भार आणि आनंदनगर स्विचिंगच्या पाले फिडरवर अंबरनाथला सहानंबर फिडरचा भार फिरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून महापारेषणकडून रिलिफ मागितल्यानंतर महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित होणार नाही.