हरियाणातून बेपत्ता झालेल्या तरुणीवर मनोरुग्णालयाच्या संवेदनशील उपचारांमुळे कुटुंबाशी भावनिक पुनर्मिलन
ठाणे: बाबा… हा शब्द तिच्या ओठांवर पुन्हा यायला तब्बल सहा महिने लागले. हरियाणातून बेपत्ता झालेली, स्वतःची ओळखही विसरलेली एक तरुणी आणि तिचा हताश परिवार… पण ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या डॉक्टर, परिचारिका, समाजसेवा विभाग आणि वागळे इस्टेट पोलिसांच्या संवेदनशील प्रयत्नांमुळे अखेर एका कुटुंबाच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले.
३ जानेवारी २०२६ रोजी तीन हात नाका परिसरात कविता (नाव बदलून) ही ४५ वर्षीय महिला रडत बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पीएसआय शशिकांत जाधव आणि महिला पोलिस मनीषा सूळ यांनी तिला ताब्यात घेतले. स्वतःची ओळख सांगता येत नसल्याने व मानसिक आजाराची लक्षणे दिसत असल्यामुळे कविताला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेमळ सुश्रुषा, सातत्यपूर्ण समुपदेशन आणि शास्त्रशुद्ध उपचारांमुळे कविताच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. ती बोलू लागली; मात्र ओळख व घराचा पत्ता आठवत नव्हता. उपचारादरम्यान ती हरियाणवी बोलीभाषेत बोलत असल्याचा महत्त्वाचा धागा मिळाल्याची माहिती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी दिली.
समाजसेवा अधीक्षक नितीन शिवदे यांनी सातत्याने संवाद साधल्यानंतर कविताने स्वतःचे नाव आणि गाव सांगितले. त्यानुसार हरियाणातील उचाना पोलिसांशी संपर्क साधून फोटो पाठविण्यात आला. तपासात ती ऑक्टोबर २०२५ पासून बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. अनेक महिन्यांपासून तिचा शोध घेणारे कुटुंबीय ठाण्यात पोहोचले.
अनेक महिन्यांनंतर लेकीला पाहताच वडिलांनी कविताला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले. या कार्यात वॉर्ड इन्चार्ज मंगला संखे, मानसोपचार परिचारिका आशा डावरे, कोमल कटके तसेच डॉक्टर, परिचारिका, समाजसेवा विभाग आणि इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.